पिंपरी | ‘अंतर्गत रस्त्यांची कामे दिवाळीच्या आधीच पूर्ण करणार’

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास सुरूवात झाली असून हे सर्व रस्ते दिवाळीच्या आधी पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी दिली.
शहरातील सुमारे १७ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी चावडी चौक येथील ४० लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय इमारतीचे लोकार्पण देखील करण्यात आले.
पुढे बोलताना आमदार शेळके म्हणाले की, गेल्या पाच वर्षात कोरोनासह अनेक अडचणींवर मात करीत तळेगाव दाभाडे शहरातील विविध विकासकामांसाठी आपण जास्तीत जास्त निधी मिळवून दिला.
भूमिपूजन झालेल्या कामांपैकी बहुतांश कामे ही दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना आदेश देण्यात आले आहेत.
प्रयत्न करूनही दिवाळीपूर्वी होऊ न शकलेली कामे निवडणुकीनंतर लवकरात लवकर पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, मंडळ अधिकारी लिंबराज सलगर, तलाठी कविता मोहमारे, पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भूमिपूजन करण्यात आलेली विकासकामे –
सिद्धीविनायक सोसायटी, मोहननगर अंतर्गत रस्ता, संत ज्ञानेश्वर शाळेमागील रस्ता, गोदाई नगर येथील रस्ता, सत्यकमल कॉलनीमधील रस्ते, रेव्हेन्यू कॉलनी येथील डी.पी.रस्ता व अंतर्गत रस्ते, ओंकारनगरमधील अंतर्गत रस्ते,
यशवंतनगरमधील बालाजी मंदिर ते रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक ते एसटी स्टॅंड ते नाचखिंड वस्ती, जुने सेवाधाम हॉस्पिटल समोरील रस्ता, मावळ लँड अंतर्गत रस्ते,
सूर्यकिरण फार्मा सोसायटी गराडे यांचे घराजवळील रस्ता डांबरीकरण करणे, पारिजात सोसायटी येथील समाजमंदिर दुरूस्ती व सुधारणा करणे, विठ्ठलवाडी हद्दीतील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे,
बनेश्वर स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता भुयारी गटर व कॉंक्रिटीकरण करणे, कुंभार वाडा, खंडोबा माळ मधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, मारुती मंदिर चौक ते डाळ आळी गणपती मंदिर ते नालबंद गल्ली पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, सुभाष चौक येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधणे.




