ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; चंद्रकात खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दानवेंची करणार तक्रार?

Chandrakant Khaire | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत वाद आता समोर आले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. दानवेंची तक्रार करण्यासाठी खैरेंनी थेट मुंबई गाठली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट देऊन खैरे दानवेंची तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
‘छत्रपती संभाजनगर शहरातील पाणीबाणीविरोधात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीचे मला आमंत्रण नव्हते. माझ्याकडे विचारणा केली जात नाही. वारंवार असे होते. याबाबत मी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पक्षाच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे’, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी म्हटले.
“शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला…”
पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आज उद्धवजी संकटात आहे. त्यामुळे एकत्र येऊन काम करावे लागेल. मात्र कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही. मी मरेल पण पक्ष सोडणार नाही. असे असताना अंबादास दानवेने मला सांगितलं नाही, याबाबत मी उद्धव साहेबाना सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतोय, असही चंद्रकांत खैरे म्हणाले.
“तो मला बोलतच नाही, मी माझे आंदोलन करणार तो करेल न करेल. आंदोलन आम्ही करणार आणि नक्की करणार. पक्ष चालवायचा असेल, तर एकत्र राहिले पाहिजे. या माणसांमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, या माणसाने काय केले सांगा. अनेक लोक सोडून जात आहेत,” अशी टीका खैरे यांनी दानवेंवर केली.
त्यावर अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ‘ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याविरुद्ध मी कसे बोलणार? त्यांना तक्रार करायची असेल तर करू शकतात. पक्षप्रमुख जे सांगतील ते मी ऐकायला तयार आहे’, असे म्हंटले होते.
दरम्यान, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात सुरू असलेल्या वादा नंतर खैरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्याने दोघांमध्ये नेमकं काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:




