– ऋषिकेश जंगम World Earth Day 2026 : 22 एप्रिल रोजी ‘वसुंधरा दिन‘ साजरा केला जातो. यंदा या दिनाचे 56 वे वर्ष साजरे होत आहे. आज निसर्गाच्या सान्निध्यात राहून हा दिवस साजरा करा. निसर्ग जसा आपला आहे तसा पशुपक्षी आणि इतर जीवांचाही आहे.निसर्ग वाचला तर जीवसृष्टी वाचेल. निसर्गाला जवळून पाहताना आणि अनुभवताना वृक्षराजीही वाढवूया आणि वसुंधरा दिन साजरा करूया…. निसर्ग हा खरोखरच एक अद्भुत आणि सृजनशील कलाकार आहे. तो प्रत्येक क्षणी आपली वेगवेगळी रूपं, रंग आणि आविष्कार आपल्यासमोर उलगडत असतो. वसंत ऋतूमधील नवपालवीची हिरवाई, पावसाळ्यातील सृष्टीची ताजेतवाने झालेली रूपं, शिशिरातील पानगळ आणि बदलणारे रंग, तर कधी शांत, चांदण्यांनी नटलेलं आकाश निसर्गाचा प्रत्येक देखावा मनाला भुरळ घालणारा असतो. हे सगळं सौंदर्य आपल्याला विनामूल्य मिळतं; मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलच्या आभासी जगात रमतो, ही खंत आहे. निसर्गात अफाट वैविध्य आढळते. असंख्य प्राणी, पक्षी, वनस्पती, फुलं, फळं प्रत्येकाची रचना, रंग, आकार वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगदी हिरव्या रंगातसुद्धा असंख्य छटा दिसतात, ज्या मानवनिर्मित रंगपटलावर तयार करणं कठीण आहे. World Earth Day 2026 खोल दऱ्या, उंच पर्वत, अथांग समुद्र, धबधबे, इंद्रधनुष्य, फुलपाखरांची रंगीत उधळण, पक्ष्यांची किलबिल हे सर्व निसर्गाचे अनुपम कलाविष्कार आहेत. निसर्गाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संतुलन आणि परिपूर्णता. प्रत्येक सजीव हा एकमेकांना पूरक असतो. काही पक्षी आणि प्राणी शेतीचं नुकसान करणाऱ्या किडी व उंदरांवर नियंत्रण ठेवतात, तर काही प्राणी पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. मृत प्राण्यांची विल्हेवाटही निसर्गच लावतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. या सर्व प्रक्रियांमधून निसर्गाची व्यवस्था किती अचूक आणि विचारपूर्वक आहे, हे लक्षात येतं. माणूस हा देखील निसर्गाचाच एक भाग आहे आणि त्याच्याकडे निसर्ग अनुभवण्याची, त्यातून शिकण्याची विशेष क्षमता आहे. परंतु प्रगती, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे माणूस निसर्गापासून दूर जात आहे. यामुळे मानसिक ताण, आरोग्याच्या समस्या आणि पर्यावरणीय असंतुलन वाढत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास मन शांत होतं, चिंता कमी होते आणि शरीरही निरोगी राहते. म्हणूनच निसर्ग हा एक उत्तम औषध मानला जातो. World Earth Day 2026 निसर्ग आपल्याला अनेक जीवनमूल्ये शिकवतो. सूर्य आपल्याला वक्तशीरपणा आणि नियमितता शिकवतो, मुंगी कष्ट आणि चिकाटीची शिकवण देते, तर बदलणारे ऋतू आपल्याला आशावाद आणि नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देतात. विशाल आकाश मोठी स्वप्नं बाळगायला शिकवतं, तर खोल दरी आपल्याला मर्यादा ओळखण्याची जाणीव करून देते. त्यामुळे निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच, ‘वसुंधरा दिन’ हा दिवस आपल्याला याच गोष्टीची जाणीव करून देतो की, निसर्गाशिवाय आपलं अस्तित्व शक्य नाही. ‘वसुंधरा दिना’ची सुरुवात कशी झाली? दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिन म्हणजेच वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेतले पर्यावरणवादी आणि खासदार म्हणजेच ‘सिनेटर गेलॉर्ड नेल्सन’ आणि हार्वड विद्यापीठात शिकणाऱ्या ‘डेनिस हेन्स’ यांनी मिळून 1970 मध्ये पहिल्यांदा वसुंधरा दिन साजरा केला. 1969 मध्ये कॅलिफोर्नियाच्या सँटा बार्बरामध्ये ऑईल स्पिल म्हणजे समुद्रामध्ये तेल सांडल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली होती. ही तेल गळती एक भयानक घटना होती ज्यामुळे सागरी जीवसृष्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, किनारी भागात प्रदूषण झाले आणि वनस्पती आणि प्राण्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेने नेल्सन प्रेरित झाले आणि त्यांनी पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रदूषण आणि त्याच्या परिणामांविरुद्ध कारवाई करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी एक विशेष दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. World Earth Day 2026 ही एक शक्तिशाली सुरुवात होती जी हळूहळू जागतिक घटना बनली. या आणि अशा विविध घटनांमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान लोकांपर्यंत पोहोचावं आणि पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्याला राष्ट्रीय महत्त्वं मिळावं या हेतूने हा पहिला पृथ्वी दिन आयोजित करण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेत त्यावेळी जवळपास 2 कोटी लोक रस्त्यांवर उतरले. त्यानंतर 1990 पासून हा एक ग्लोबल इव्हेंट झाला. दर वर्षी जवळपास 200 देशांमधले कोट्यवधी लोक वसुंधरा दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. दरम्यान, या दिवसाच्या इतिहासाबद्दल बोलताना, 1969 मध्ये युनेस्कोने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत 21 मार्च रोजी पृथ्वी दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु नंतर काही कारणास्तव ही तारीख 22 एप्रिल करण्यात आली. तेव्हापासून, हा दिवस दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. ‘वसुंधरा दिन’ आपल्याला सतत आठवण करून देतो की पृथ्वी ही केवळ संसाधनांचा स्रोत नसून आपलं घर आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे यांसारख्या छोट्या कृतींमधून आपण मोठा बदल घडवू शकतो. आमची शक्ती, आमचा ग्रह ! यावर्षीची थीम “आमची शक्ती, आमचा ग्रह” (Our Power, Our Planet) हा आशादायी आणि प्रेरणादायी संदेश देणारी आहे. हे केवळ एक घोषवाक्य नाही, तर एक स्पष्ट संदेश आहे की पृथ्वीचे भविष्य बदलण्याची शक्ती फक्त सरकार किंवा मोठ्या कंपन्यांकडे नसून प्रत्येक माणसाच्या हातात आहे. World Earth Day 2026 या वर्षाची थीम आपल्याला विचार करायला लावते की आपण जे खरेदी करतो, ज्या पद्धतीने प्रवास करतो, जे अन्न खातो आणि ज्या प्रकारे मतदान करतोहे सर्व निर्णय जागतिक पर्यावरणावर परिणाम करतात. Earth Day 2026 लोकांना असहायतेतून जबाबदारीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. तक्रार करण्याऐवजी सहभाग घ्या, हीच या चळवळीची दिशा आहे. ही थीम हेही स्पष्ट करते की पर्यावरणीय सुधारणा एका दिवसात किंवा एका निर्णयाने होत नाही, तर सतत आणि सामूहिक प्रयत्नांमुळे होते. वसुंधरा दिनाची थीम कशी ठरवली जाते? ‘Earth Day’ ची थीम प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरणीय परिस्थिती आणि त्या वेळच्या मोठ्या समस्यांवर आधारित ठरवली जाते. – जागतिक पर्यावरणीय आव्हानांचा अभ्यास केला जातो (हवामान बदल, प्रदूषण, वनतोड इत्यादी गोष्टी) – तज्ज्ञ, पर्यावरण संस्था आणि संशोधक यांचे सल्ले घेतले जातात – जनजागृतीसाठी लोकांना प्रेरित करणारा संदेश निवडला जातो – विविध देशांतील सहभाग आणि सामाजिक परिणाम लक्षात घेतले जातात – अशी थीम निवडली जाते जी लोकांना कृती करण्यासाठी प्रेरित करेल हे देखील वाचा : जागतिक वसुंधरा दिन : वसुंधरेने पुन्हा नेसावा हिरवा शालू