व्याजदरात होऊ शकते 0.25 टक्के कपात; नोमुरा ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला अंदाज

मुंबई – कोसळलेल्या विकास दराला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक शुक्रवारी म्हणजे सहा डिसेंबर रोजी अनेकांना आश्चर्याचा धक्का देत व्याजदरात पाव टक्के कपात करण्याची शक्यता जपानच्या नोमुरा या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पुढील तीन पतधोरणात प्रत्येकी पाव टक्के व्याजदर कपात करून रिझर्व बँक सहा महिन्यात एक टक्का व्याजदर कपात करेल असे या संस्थेचे म्हणणे आहे.
एवढेच नाही तर रोख राखीव प्रमाणातही रिझर्व बँक अर्धा टक्क्याची कपात करण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केले आहे.
या अगोदर ब्लुंमबर्ग या संस्थेने देशातील 49 विश्लेषकाशी याबाबत चर्चा केली असता 42 विश्लेषकांनी महागाईची आकडेवारी पाहता शुक्रवारी रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार नाही. मात्र फेब्रुवारी महिन्यात कपात करेल असे सांगितले आहे.
पहिल्या तिमाहित विकासदर कमी होऊन 6.7 % झाला. त्यानंतर दुसर्या तिमाहित विकासदर कोसळून 5.4% झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकार अस्वस्थ आहे. अशा परिस्थितीत विकास दराला चालना देण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन व्याजदर कपातीची आवश्यकता व्यक्त करीत आहेत.
नाशवंत अन्न घटकाच्या महागाईचा व्याजदराशी संबंध लावला जाऊ नये असा युक्तिवाद अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार ही अनंत नागेश्वरन आणि इतर अधिकारी करीत आहेत. महागाई निर्देशांकातील 64% वस्तूच्या किमती 4% पेक्षा कमी दराने वाढल्या आहेत. तर उरलेल्या 36 वस्तूच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे महागाई कमी पातळीवर आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
महागाई वाढणार नाही –
सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत व्याजदर कपात केल्यास रुपया अस्थिर होऊन महागाई वाढेल असा युक्तिवाद केला जातो. मात्र नोमुराने सांगितले की हा युक्तिवाद तेवढा तर्कसंगत नाही. परकीय चलनाचा वापर करून या आव्हानाचा सामना रिझर्व्ह बँक करू शकेल असे या संस्थेचे म्हणणे आहे. जर आता रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव टक्का कपात केली तर व्याजदर 6.25% होईल व पुढील सहा महिन्यात हा व्याजदर 5.50% पर्यंत जाईल.



