पुणे – पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने येत्या मंगळवारी (दि.२०) सकाळी १० वाजता सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहयोगातुन व पुढाकाराने दरवर्षी ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते. यंदाही या स्पर्धेसाठी नियोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ विभागासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक दूरदृष्टी नेतृत्व, सोशल मीडिया चिंता व चिंतन, जंगलाच्या शोधात बिबट्या, विद्यार्थी जीवन आणि जबाबदारी, वरिष्ठ (पदवी) विभागासाठी अर्थतज्ञः डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पर्यावरण बदलाचे आव्हाने, कृत्रिम बुद्धिमत्ता संधी आणि आव्हाने, ओसाड खेडी आणि बकाल शहरे याप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे यांनी दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यातील मान्यताप्राप्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक २ विद्यार्थी, विद्यार्थीनी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. स्पर्धा मराठीतून होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. संयोजन समितीच्या प्रा.कैलास शिंदे, प्रा.सूर्यकांत अस्वरे, प्रा.विजय गायकवाड, प्रा.गीतांजली हाके, सुरज कांबळे यांनी स्पर्धेसाठी सर्व तयारी केलेली आहे.