Rajgurunagar : महायुती-महाविकास आघाडीत चुरस
Rajgurunagar : खेड तालुक्यात शिक्षक मतदारसंघासाठी 630, तर पदवीधर मतदारसंघासाठी दोन हजार 462 मतदार आहेत. शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेकडून प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला जात आहे.

राजगुरुनगर : पुणे पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्ही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शुक्रवारी (दि. 23 ऑक्टोबर) मतदान होणार असून, खेड तालुक्यातील एकूण तीन हजार 92 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यात सहा ठिकाणी मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे, तर महाविकास आघाडीकडून प्रा. जयंत आसगावकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात लढत होत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
खेड तालुक्यात शिक्षक मतदारसंघासाठी 630, तर पदवीधर मतदारसंघासाठी दोन हजार 462 मतदार आहेत. शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेकडून प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला जात आहे. दुसरीकडे, पदवीधर मतदार विविध भागांत विखुरलेले असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची धावपळ सुरू आहे. खेड तालुक्यात दोन्ही मतदारसंघांसाठी मतदानाची व्यवस्था सहा ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आळंदी परिसरातील चर्होली बुद्रुक येथील महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, चाकण परिसरातील झित्राईमळा येथील जिल्हा परिषद शाळा, कडूस येथील जिल्हा परिषद शाळा, राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय, पाईट येथील जिल्हा परिषद शाळा आणि वाडा येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे.
मतदानाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चार अशी आहे. मतदान मतपत्रिकेद्वारे होणार असून, मतदारांना पसंतीक्रम नोंदवताना शिक्का मारण्याऐवजी 1, 2, 3 असे अंक लिहावे लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक अधिकार्यांकडून मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिलेल्या स्केच पेनचा वापर करावा लागणार आहे. शुक्रवारी होणार्या मतदानानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निकालातून पुणे विभागातील राजकीय समीकरणांचे कोणते चित्र समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजितदादांची उणीव
पुणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक राजकीय प्राबल्य, पक्षातील फाटाफूट आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे विभागात प्रभाव असलेले राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा शिक्षक आणि राजकीय वर्तुळात होत असल्याचे चित्र आहे. पुणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व आणि बदललेली राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर भाजपने अधिकृत उमेदवार निवडणुकीत उतरविल्याने या लढतीकडे राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने पाहिले जात आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता आहे.
मतदानासाठी प्रशासन सज्ज
उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी मतदान केंद्रांवरील व्यवस्थेबाबत माहिती दिली. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच अधिकारी-कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचार्यांचे प्रशिक्षण खेड पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आले. यावेळी मतपेटी सीलबंद करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.





