पिंपरी – केंद्र सरकारने जुने 29 कामगार कायदे रद्द करुन चार सुधारित कामगार विधेयके संसदेत मंजूर केली. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला किमान हमीभाव नाकारणारा कायदा मंजूर केला. हे कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी कॉंग्रेस प्रणित राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या “इंटक’ या कामगार संघटनेच्या वतीने देशव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचे पुणे जिल्ह्यातील उद्घाटन “इंटक’चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते पिंपरीत करण्यात आले. यावेळी इंटकचे पुणे जिल्हा सरचिटणीस मनोहर गडेकर, हिंद कामगार संघटनेचे शांताराम कदम, सचिन कदम, यशवंत सुपेकर, महिला मजदूर संघाच्या अध्यक्षा भारती घाग, शितल सिकंदर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, महाराष्ट्रातून दोन कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन घेण्यात येणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून एक लाख सह्यांचे निवेदन घेण्यात येणार आहे. हि निवेदने सोनिया गांधी व डॉ. जी. संजीवा रेड्डी यांचे शिष्टमंडळ पुढील महिन्यात पंतप्रधान व राष्ट्रपतींना भेटून हि निवेदने देणार आहेत.त्यामुळे “इंटक’ ने सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आपली प्रतिक्रिया नोंदवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.