पिंपरी, दि. 17 – पिंपरी-चिंचवड शहरात कोणतीही काळजी न घेता, लाईफ जॅकेट न घालता नदीची साफसफाई केली जात आहे. कर्मचारी जीव धोक्यात घालून आपले काम करत आहेत. त्या बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना व संबंधितांवर योग्य कार्यवाही करा, अशा सूचना राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात या सूचना देण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात ठेकेदारांमार्फत नदी पात्रात स्वच्छता केली जात आहे. ही सफाई करताना कर्मचाऱ्यांना पुरेशी सुविधा-साधने देणे गरजेचे आहे. लाईफ जॅकेट देणे देखील बंधनकारक आहे. मात्र अनेक ठेकेदार कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा साधने पुरवित नाहीत. परिणामी कामगारांचा अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नदी पात्रातील स्वच्छता करताना लाईफ जॅकेट न घालता कर्मचारी साफसफाई करत होते. या बाबत दै. प्रभात मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
वृत्तानंतर व तक्रारीनंतर त्याची राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने दखल घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये या बाबत लक्ष घालून संबंधितांना योग्य सूचना देणेबाबत आदेश दिले आहेत.