लोणंद -गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी (दि. 21) लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात आढावा बैठक घेऊन करोनाबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. कामाची माहिती घेऊन पाडेगाव टोलनाक्यावर पाहणी केली. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधे चांगला समन्वय असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचे नागरिक चांगले पालन करत आहेत तसेच करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोलिस दल चोवीस बाय सात अहोरात्र प्रयत्नशील आहे. त्यांना महसूल विभाग आणि शिक्षकसुद्धा या कामात मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिरवळ परिसरात वेगाने फैलावत असलेल्या करोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी कंपन्यात बाहेरून येणाऱ्या कामगारांचा स्त्राव घेऊन तपासणी करून मगच कंपनीत घेण्याची सूचना प्रांताधिकाऱ्यांना केली असल्याचे सांगून कंपनीने कामगारांना कंपनीच्या जवळच राहण्यासाठी सोय उपलब्ध करण्यास सांगितले असल्याची माहिती दिली. सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील पाडेगाव टोलनाक्याला भेट देऊन तेथील कामाची पाहणी त्यांनी केली. तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या कामाचा गौरव केला. त्यांच्यासमवेत आमदार मकरंद पाटील, नगराध्यक्ष सचिन शेळके, प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी अविनाश पाटील, सीईओ हेमंत ढोकले. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, नितीन भरगुडे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, अजित यादव, प्रदीप माने, आदेश जमदाडे, गणेश जाधव, प्रमोद शिंदे, लक्ष्मण जाधव, हेमंत पवार, अविनाश नलवडे, जगन्नाथ यादव, शंभूराजे भोसले, प्रणव यादव, आदी मान्यवर उपस्थित होते.