प्रेरणादायी! जिद्द अन् मेहनतीने मुलगा बनला पायलट; तर वडिलांनी केली गावच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

मुंबई : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इच्छित फळ कोणालाही मिळवता येत. याचेच एक उदाहरण साताऱ्यातील पळशी गावातील चिराग डोईफोडे या तरुणाने निर्माण केले आहे. चिराग डोईफोडे हा तरुण पायलट झाला आहे, त्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याला दुसरा कर्मशिअल पायलट मिळाला आहे.
चित्रपट निर्माते, देवमाणूस या मालिकेतील ‘लाला ‘फेम डॉ. शशिकांत डोईफोडे यांचा मुलगा चिराग डोईफोडे हा कमर्शिअल पायलट आहे. सातारा जिल्ह्याचे विविध क्षेत्रात नाव चमकले असले तरी हवाईक्षेत्र त्याला अपवाद होता. या क्षेत्रातही जिल्ह्याचे नाव चमकले असून चिराग डोईफोडेच्या रुपाने दुसरा कमर्शियल पायलट जिल्ह्याला मिळाला आहे.
मुलगा पायलट झाल्यास हनुमानाला मंदिरावर पुष्पवृष्टी करेन असा नवस बोललो होतो असे शशिकांत डोईफोडे यांनी सांगितले. मुलगा पायलट झाल्यानंतर चिराग डोईफोडेच्या वडिलांनी थेट हेलिकॉप्टरमधून ग्रामदैवत हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करत आपला आनंद साजरा केला. चिरागचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. परंतु चौथीनंतर पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी तो बारामती येथे गेला.
लहानपणासून त्याला पायलट होण्याची इच्छा होती. बारावी पास झाल्यानंतर त्याने डीजीसीए अंतर्गत विविध परीक्षा दिल्या. यानंतर दीड ते दोन वर्षांमध्येच त्याने परीक्षा उत्तीर्ण केल्या. नुकताच त्याला पायलटचा परवाना मिळाला आहे. सातवीत असताना मुलाने जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या आईवडिलांना झाला असून हवाईक्षेत्रात अनेक संधी आहेत, त्याचा शोध घेऊन मुलांनी त्यात प्राविण्य मिळवण्याची गरज आहे.





