प्रेरणा: करवंद बागेतून आर्थिक सुबत्ता

दत्तात्रेय अंबुलकर,
विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्‍याच्या अश्‍विनीपूर येथे जनार्दन जाधव हे एक शेतकरी आहेत. या परिसरातील जमीन कसदारपणाच्या संदर्भात हलकी, मुरमाड व पडीक स्वरूपाची असल्याने पारंपरिक शेती उत्पन्नाचे फारसे उत्पादन मिळकत नसे. त्याशिवाय शेतीत गुरा-ढोरांचा मुक्‍त आणि मोकाट संचार असल्याने शेतीचे मोठेच नुकसान होत असे.

यावर तोडगा म्हणून अश्‍विनीपूरच्या काही शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात व शेताभोवती करवंदीचे कुंपण लावले. त्यामुळे या कुंपणाने शेताची सुरक्षा तर झालीच शिवाय शिवारकाठावरील करवंदांच्या झाडापोटी त्यांना जोडउत्पन्नही मिळू लागले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. आपला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे प्रोत्साहित झालेल्या जनार्दन जाधव यांनी आपल्या शेतात करवंदीचे उत्पादन अधिक चांगले होते या अनुभवातून करवंदांची शेती करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला आपल्या शेतातील तीन एकर जागेत केवळ करवंदांची लागवड सुरू करणाऱ्या जनार्दन जाधव आज सुमारे साडेअकरा एकरात करवंदाची बाग लावली.

करवंदांचे चांगले उत्पन्न आणि उत्पादन साधण्यावर जाधव कुटुंबाने आपले लक्ष केंद्रित केले. त्याची विक्री केवळ विदर्भातच केली असता पुरेसा भाव मिळत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही करवंद विकण्यास-पाठविण्यास सुरुवात केली. या प्रयत्नांना सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे व दर्जेदार उत्पादनामुळे आज विदर्भ-मराठवाडाच नव्हे तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती परिसरातील मोठे ग्राहकही करवंदांच्या घाऊक खरेदीसाठी जनार्दन जाधव यांच्या करवंद शेतीपर्यंत थेट येत असून त्याद्वारा त्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळू लागले.
करवंद शेतीतून वार्षिक सुमारे सव्वाशे टनांपर्यंत उत्पादन होते. यातील खर्च वजा जाता त्यांना एकरी सुमारे 1 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. या हिशेबाने त्यांना दरवर्षी सुमारे 7 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न फायदा स्वरूपात होत आहे.

करवंदीच्या शेतीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे करवंदाच्या शेतीला वर्षात दोन प्रकारची फळे लागतात. यामध्ये हिरव्या व गुलाबी रंगांच्या करवंदांचा समावेश होतो. यापैकी हिरव्या रंगांच्या करवंदांचा उपयोग भाजी, लोणची, चटणी यासाठी केला जातो तर गुलाबी करवंदांचा उपयोग चेरी-मुरांबा यासाठी केला जातो. करवंदांच्या या सर्व उत्पादनांना नेहमी व बारमाही स्वरूपाची मागणी असते. दुष्काळी शेतीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या यशस्वी करवंद शेतीच्या प्रयोगानंतर आता करवंद शेतीच्या बागेची योग्य देखभाल करून निगा राखण्यासोबतच करवंदांच्या झाडांची रोपवाटिका तयार करून त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या आगळ्यावेगळ्या करवंदी रोपवाटिकेतून करवंदांच्या रोपट्यांची प्रति रोपटे 15 रुपये अशा हिशेबाने विक्री करून व सुमारे 20 हजारांहून अधिक रोपांच्या विक्रीद्वारे जाधव आता अतिरिक्‍त कमाई करू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.