वाघोलीत अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडून वाहतूक समस्येची पाहणी

वाघोली – पुणे शहर पूर्व विभाग अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाघोली येथील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येची पाहणी करून तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
वाघोली मधील विविध समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, समक्ष भेटून, अनेक वेळा विधिमंडळात प्रश्न उपस्थित करुन लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार अशोक पवार यांनी प्रयत्न केला आहे. त्यानंतर वाघोली समस्यांबाबत प्रशासनाची उदासीनता पाहून ‘रन फाॅर वाघोली’चे आयोजन करुन ढिम्म प्रशासनाला हलवण्याचा प्रयत्न केला आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा अमोल झेंडे, लोणीकंद वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पीएमआरडीए, पीएमसी, पीडब्ल्यूडी, ईलेक्ट्रीसिटी डिपार्टमेंट आदी विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन वाघोलीच्या वाहतूक कोंडी समस्येची खराडी जकात नाका ते लोणीकंद पर्यंत पाहणी केली.
तसेच यासाठी पुणे-नगर रोडच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंनी पर्यायी मार्गाची देखील प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच वाघेश्वर मंदिर चौकातील रुंदीकरण, सबवे, आव्हाळवाडी चौक केसनंद चौक यांची प्रत्यक्ष पाहणी करुन काही सूचना केल्या. तसेच वाहतूकीत अडचणीचे ठरणारे वीजेचे खांब हटवून बंच केबल टाकणे, सायंकाळनंतर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस रस्त्यावर कोठेही उभ्या रहात असल्याने होणारी वाहतूक कोंडी या बाबींवर देखील चर्चा झाली.
..त्यांच्या प्रयत्नांना यश –
वाघोलीमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे रात्री- अपरात्री वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाहक संपत गाडे व इतर सदस्य बुजवून नागरिकांना मदत करीत आहेत. दुसरीकडे वाहतूक शाखेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसात गेलेल्या बदलांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मोलाची मदत झाली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी केलेल्या बदलांची देखील वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली असून नागरिकांकडून संपत गाडे, गजानन जाधव, अमोल झेंडे यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





