शालेय पोषण आहाराची दरमहा दहा शाळांची तपासणी

सातारा – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराची दर महिन्याला दहा शाळांची तपासणी होणार आहे. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तर भरारी पथके व दक्षता पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. पोषण आहारात गैरप्रकार आढळून आल्यास संबधितांवर कडक कारवाई होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर दोन वर्षानंतर यंदा प्रथमच ऑफलाइन शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून उत्तम दर्जाचा आहार दिला जातो. मात्र, गेल्या काही दिवसात काही शाळांमध्ये या योजनेतून विद्यार्थ्यांना कमी आहाराचे वाटप करणे, निकृष्ट प्रतीचा आहार देणे, आहाराचे वाटप न करणे अशा काही योजनेमध्ये गैरव्यवहार करणे अशा तक्रारी दाखल होत होत्या. ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी भरारी पथके व दक्षता पथकाची नेमणूक करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या पथकात जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
या पथकांच्या तपासणीत शाळेतील पिण्याच्या पाण्याची सुविधा, खाद्यपदार्थांचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला आहे का, विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तांदूळ व इतर धान्य वजन करून वापरले आहे का, स्वयंपाकी, मदतनीस यांची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी केली आहे का, आहाराबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना पुरेसा आहार दिला जातो का, धान्याचा शिल्लक साठा किती याची तपासणी होणार आहे. तपासणीचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तीन दिवसांत सादर करायचा आहे. योजना अंमलबजावणी त्रुटी आहेत त्या शाळांनी सुधारणा करावी. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत गैरव्यवहार आढळून आल्यास कारवाई होणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आदेश काढला आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात येणार आहे. भरारी व दक्षता पथकांमार्फत जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामीण भागातील शाळांची तपासणी होणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– विनय गौडा (मुख्य कार्यकारी अधिकारी)





