बेल्हे – राजुरी-बेल्हा जिल्हा परिषद गटातील मंजूर असलेल्या विविध कामांची पाहणी नुकतीच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
जिल्हा परीषदेचे छोटे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव बोरकर, उपअभियंता गोडे, शाखा अभियंता मुके, विजय कुऱ्हाडे, राजुरी-बेल्हा जिल्हा परिषद गटाचे सदस्य पांडुरंग पवार यांच्यासोबत मंजूर प्रकल्पांची पाहणी दौरा करण्यात आला.
यावेळी अधिकाऱ्यांनी राजुरीजवळील उंचखडक येथील आनंदवन बंधाऱ्याचा पाणीसाठा वाढावा, भितींची व सांडव्याची उंची वाढवावी, यासाठी पाहणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. उंचखडक, राजुरी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. बांगरवाडी पाझर तलावातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, आणे, नळावणे येथील बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु जलसाठा वाढावा, यासाठी सांडव्याची उंची वाढवून गाळ काढून साठा वाढण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे ठरले. शिंदेवाडीतील पाझर तलावाची गळती रोखण्यायासाठी निधी मंजूर झाला आहे. काम प्रगतीपथावर आहे, त्याची पाहणी करण्यात आली.
आनंदवाडी येथील दोन्ही बंधाऱ्यांची पाहणी करून एकाचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दुसऱ्या बंधाऱ्याची दुरूस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम सुरू झाले त्याचीही पाहणी अधिकाऱ्यांनी केली. दौऱ्यात अनेक दुरूस्त्या, सुधारणा सुचवल्या आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध निधी देऊन कामे पूर्णत्वाकडे नेणार आहोत, असे पवार यांनी सांगितले.