स्थायी समिती सदस्य सरसावले
शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव
दोन-तीन वर्गांना मिळून एक शिक्षक
पुणे – महापालिका शाळांमधील त्रुटींची पाहणी करण्यासाठी स्थायी समिती सदस्य सरसावले असून, शाळांना भेट देऊन ते अहवाल तयार करणार आहेत. तद्नंतर हा अहवाल आयुक्तांना सादर होणार आहे. या संबंधी स्थायी समिती बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षणमंडळ बरखास्त झाल्यानंतर पालिका शाळा शिक्षण विभागाकडून चालवल्या जातात. शिक्षण समिती गठीत करण्याची वारंवार मागणी होत असतानाही त्यावर अद्याप निर्णय होत नाही. त्यामुळे शाळांबाबतचे निर्णय स्थायी समितीमार्फत घेतले जातात. सध्या या शाळांमध्ये सुविधांचा अभाव आहे. अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दोन-तीन वर्गांना मिळून एक शिक्षक अशी दुर्दैवी स्थिती आहे. यावरून या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा काय असेल याची कल्पना येते.
एकूणच येथील व्यवस्थेबाबत अंधार आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होत असून, शाळा सोडून जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पालकांनी परवडत नसतानाही जास्त फी भरून खासगी शाळांची वाट धरली आहे.
महापालिकेच्या शाळांवर बैठकीत पुन्हा चर्चा
शाळांमधील असुविधेबाबत मुख्यसभा, स्थायी समितीमध्ये वारंवार चर्चा होते, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघत नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत शाळांवर पुन्हा चर्चा झाली. यावेळी त्रुटी दूर करण्यासाठी 3 सदस्य आणि 2 अधिकारी यांची समिती गठीत केली. ही समिती प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन पाहणी करेल. त्यानंतर 15 दिवसांत अहवाल आयुक्तांना सादर करेल. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शाळांमधील त्रुटी दूर कराव्यात, असा निर्णय स्थायीच्या बैठकीत घेण्यात आला.