प्रभात वृत्तसेवा पिंपरी – नो-एंट्रीतून गाडी नेण्याचा हट्ट करीत एका कथित आमदाराच्या पुतण्याने पोलिसांना शिवीगाळ करीत धमकीही दिली. ही घटना रविवारी (दि.सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास चाकण येथील माणिक चौकात घडली.मयुर काळे (नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. चाकण वाहतूक पोलीस विभागातील हवालदार लक्ष्मण आनाजी सांगडे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी आमदाराचा पुतण्या आहे, असे सांगून एमएच १४ एमके ९७९७ क्रमांकाची गाडी नो-एंट्रीमध्ये घालण्याचा अट्टहास केला. या वेळी वाहतूक विभागातील पोलीस हवालदार लक्ष्मण सांगडे यांनी अडवले असता, आरोपीने जोरजोरात आरडाओरड करत शिवीगाळ केली. “पोलीस काय उपटणार?” अशा अपमानास्पद शब्दांत बोलत दमदाटी केली. आरोपीने बॅरीकेडसमोर वाहन थांबवून जबरदस्तीने नो-एंट्रीत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहायक निरीक्षक प्रसन्न जहाड, प्रकाश राठोड, उपनिरीक्षक नरवडे आणि पोहवा सचिन निघोट यांनी हस्तक्षेप केला असता, आरोपीने सर्वांशी हुज्जत घातली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना करून लोकसेवकाला धमकावले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.