पिंपरी | एमएनजीएलच्या खोदकामाची चौकशी करा

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून पाइपलाइन करिता रस्त्याचे खोदकाम केले आहे. या खोदकामाची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
एमएनजीएल कंपनीकडून शहरात पाइपलाइन करिता रस्त्याचे खोदकाम सुरु केले आहे.खोदकाम करण्यात आलेले रस्ते महाराष्ट्र सुवर्ण जयंती महानगरोत्थान योजनेअंतर्गत नव्याने केले आहेत. मात्र या खोदकामामुळे रस्त्यांची दुरावस्था होत असून शासन निधीचा मोठा अपव्यय होत आहे.
या कंपनीस आचारसंहिता काळात रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे का, खोदकामाची रॉयल्टी भरली आहे का? रस्त्यांची सुधारणा करण्याची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आहे? याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदल्यामुळे विद्यार्थी, नागरिक यांना पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली आहे.




