- उपचारासाठी करावे लागले आंदोलन
- मोकाट कुत्र्यांनी दोन वासरांना केले जखमी
- पशू वैद्यकीय विभागाचा संतापजनक भोंगळ कारभार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे गायीच्या जखमी वासरांवर उपचार करण्यासाठीची यंत्रणाच नसल्याने एका वासराला जीव गमावावा लागला. वासराला उपचार मिळावेत, यासाठी गौरक्षकांना महापालिकेच्या प्रवेशद्वारापुढे आंदोलन केले, परंतु ते निष्फळ ठरले. पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने दोन्ही वासरांना उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मोकाट कुत्र्यांनी दोन जखमी वासरांना जखमी केले होते. पशू वैद्यकीय विभाग मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तही करत नाही आणि जखमी प्राण्यांवर उपचारही करत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. या कुत्र्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा महापालिकेच्या महासभेतही दोन दिवसांपूर्वी चर्चेसाठी आला होता. याच मोकाट कुत्र्यांनी नुकत्याच जन्मलेल्या दोन वासरांना जखमी केले. या वासरांवर उपचारासाठी बजरंग दलाचे पुणे जिल्हा सरचिटणीस कुणाल साठे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाशी संपर्क साधला असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली.
पशू वैद्यकीय विभागाने, आपल्याकडे जनावरांच्या उपचारासाठी यत्रंणाच नसल्याचे सांगत औंध रुग्णालयाचा पत्ता सांगितला. पालिका प्रशासनाच्या या निष्क्रियतेवर संतापून साठे यांनी वासरांना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेऊन उपचार करण्याची मागणी केली. सुमारे एक तासांनंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त अजित पवार यांनी येत्या एक महिन्यात जनावरांच्या उपचारासाठी यत्रंणा उपलब्ध केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका वासराला प्राण गमावावे लागले. यानंतर, जखमी वासरापैकी जिवंत राहिलेल्या एका वासराला पांजरपोळ येथील बंदिस्त जनावरांच्या सुरक्षित जागेवर नेण्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एका नवजात वासरास प्राण गमावावे लागले. पालिका मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त करत नाही आणि जखमी जनावरांवर उपचार ही करत नाही, मग पशू वैद्यकीय विभागाचे नेमके काम तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.