पुणे | मराठीला अभिजात भाषा दर्जासाठी पुढाकार घ्यावा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण तरी पुढाकार घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र साहित्य परिषदेने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना केली आहे. तसे पत्रही त्यांना मसापने दिले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येऊन लढा द्यायला हवा. आपण यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
या पत्रात महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली आहे. यात प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती.
२०१६ मध्ये उभारलेली लोकचळवळ, डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठका, पंतप्रधान कार्यालयाशी केलेला वेळोवेळचा पत्रव्यवहार, महाराष्ट्रातून पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्रे पाठवणे, आदींचा समावेश आहे. तसेच मद्रास उच्च न्यायालयाची याचिका निकाली निघाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत केलेले प्रयत्न, त्यातील असफलता याविषयी देखील पत्रात नमूद केले आहे.
२०१७ साली बडोदा येथे झालेल्या ९१ व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनाही विनंती करण्यात आली होती. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. सर्व मराठी खासदारांना पत्र पाठवली. त्याचा परिणाम म्हणून लोकसभेत काही प्रमाणात आवाज उठला. जानेवारी २०१८ मध्ये दिल्ली येथे जाऊन मसापने धरणे आंदोलनही केले.
आता अभिजात भाषेसाठीचे निकष बदलले जाणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. जर, तसे झाले तर पुन्हा एकदा नव्याने या विषयाचा श्रीगणेशा करावा लागेल. या विषयासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन केवळ या प्रश्नासाठी दिल्लीत जाऊन पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांची भेट घेणे आवश्यक आहे.
साहित्य संस्थांनी त्यांचे काम चोख केले आहे, आता गरज आहे ती राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येऊन लढा द्यायला हवा. आपण यासाठी पुढाकार घ्यावा, ही नम्र विनंती. असे या पत्रात म्हटले आहे.





