एकूण औद्योगिक उत्पादनांवर परिणाम शक्य
नवी दिल्ली – पायाभूत सुविधा क्षेत्राच्या उत्पादकतेत मार्च महिन्यात अल्प वाढ होऊन ती 4.7 टक्के एवढी झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात या क्षेत्राची उत्पादकता 4.5 टक्क्यांनी वाढली होती. पायाभूत सुविधा क्षेत्रात आठ मोठ्या उद्योगांचा समावेश होतो. त्यात कोळसा, क्रूड ऑईल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्राचा समावेश आहे.
2018- 19 या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता 4.3 टक्के या पातळीवर कायम राहिली आहे. मार्च महिन्यात कोळसा क्षेत्राची उत्पादकता 9.1 टक्के होती. नैसर्गिक वाय, तेल शुद्धीकरण, खते पोलाद सिमेंट क्षेत्रात थोडीफार वाढ झाली असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. क्रुडचे उत्पादन मात्र मार्च महिन्यात 6.2 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर विजेचे उत्पादन 1.4 टक्क्यांनी कमी झाले असल्याचे सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्राचा एकूण औद्योगिक उत्पादनात वाटा 41 टक्के असतो. पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता केवळ 4.7 टक्क्यांनी वाढली असल्यामुळे एकूण औद्योगिक उत्पादनात फारशी वाढ होणार नसल्याचे आता गृहित धरले जाऊ लागली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून औद्योगिक उत्पादन, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी होत आहे. या कारणामुळे या क्षेत्रांनी व्याजदर कपातीची मागणी केलेली होती. रिझर्व्ह बॅंकेने दोन वेळा आपल्या रेपो या मुख्य व्याजदरात कपात करूनही या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक वाढत नसल्याचे दिसून येत आहे.
निर्यात कमी झाल्यामुळे आणि देशांतर्गत मागणी कमी झाल्यामुळे हे क्षेत्रात विस्तारीकरण होत नाही, असे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे नव्या सरकारला या क्षेत्रात ऊर्जा आणण्यासाठी मोठे काम करावे लागणार असल्याचे समजले जाऊ लागले आहे.