पायाभूत सुविधा क्षेत्र संकटात: फेब्रुवारीत उत्पादकता 2.9% वर घसरली, आठ महिन्यांचा निचांक

नवी दिल्ली : औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असले तरी पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता फेब्रुवारीत 2.9% वर घसरली आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा नीचांक आहे. मागील वर्षी फेब्रुवारीत हीच उत्पादकता 7.1% होती. या क्षेत्राचा औद्योगिक उत्पादनात 40% वाटा असल्याने एकूण वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जानेवारीत 5.1% असलेली उत्पादकता मासिक आणि वार्षिक स्तरावरही कमी झाली आहे.
फेब्रुवारीत खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन घटलं, तर कोळसा (1.7%), तेल शुद्धीकरण (0.8%), आणि पोलाद (5.6%) क्षेत्रात मर्यादित वाढ दिसली. वीज निर्मिती केवळ 2.8% वाढली, जी गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. मात्र, खत (10.5%) आणि सिमेंट (10.6%) क्षेत्रांनी चांगली कामगिरी करत एकूण आकडेवारीला आधार दिला. अन्यथा ही आकडेवारी आणखी खालावली असती.
एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत या क्षेत्राची उत्पादकता 4.4% वाढली, जी गेल्या वर्षी 7.8% होती. करोनानंतर केंद्र सरकारने या क्षेत्रात गुंतवणूक वाढवली, पण खासगी क्षेत्र मागणीअभावी माघार घेत आहे. सरकार खासगी गुंतवणुकीसाठी आग्रह करत असलं तरी महाग व्याजदरांमुळे खासगी क्षेत्र तयार नाही. यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्राची गती मंदावली असल्याचं चित्र आहे.





