Inflation: खनिज तेल महाग झाले आहे. अशा परिस्थितीत मार्च महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई वाढल्याची आकडेवारी अगोदरच जाहीर झाली आहे. आता घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर 38 महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन तब्बल 3.88% इतका नोंदला गेला आहे. त्यामुळे आगामी काळात किरकोळ महागाई वाढून स्थूल अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आता गृहीत धरली जात आहे. अर्थव्यवस्थेवरील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी आगामी काळात अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेकडून विविध उपाय योजना करणे अपेक्षित आहे. प्राप्त आकडेवारीनुसार इंधनाच्या किमती बरोबरच वीज आणि उत्पादित वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. आखातातील पेच प्रसंगाचा अर्थव्यवस्थेवर आता परिणाम दिसू लागला आहे. गेल्या पाच महिन्यापासून घाऊक महागाई एकतर्फी वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात या महागाईचा दर 2.13 टक्के होता. तर गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये या महागाईचा दर 2.25 टक्के होता. मुळात खनिज तेलाची आयात महागात पडत असल्यामुळे आणि व्यापार युद्धामुळे आयात वस्तूच्या किमती वाढत असल्यामुळे घाउक महागाईचा दर आता 4% च्या जवळपास गेला आहे. लवकरच याचे प्रतिबिंब किरकोळ महागाईत पडेल. रिझर्व्ह बँक व्याजदर ठरविताना किरकोळ महागाईचा विचार करीत असते. या महागाईचा दर चार टक्क्याच्या वर गेल्यानंतर रिझर्व्ह बँक महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढीसारख्या उपाययोजना करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकते. खनिज तेलाच्या किमती मार्च महिन्यामध्ये 51 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मॅन्युफॅक्चरिंग वस्तूच्या किमती 3.39 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत एकूणच महागाईच्या आकडेवारीवर याचा नकारात्मक परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला आहे. अन्नधान्य भाजीपाला इत्यादींच्या किमती अतिरिक्त उत्पादनामुळे बर्याच नियंत्रणात असल्या तरी आता मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उत्पादनाच्या किमती वाढत आहेत.