LPG Cylinder Price : अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात देशाचे खर्च, उत्पन्न आणि योजनांबाबत घोषणा असतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या घरच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे. यातच आता अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी महागाईचा फटका बसला आहे. 19 किलोचा गॅस सिलिंडर 14 रुपयांनी महागला आहे.
IOCL च्या वेबसाईवर दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यानुसार दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769.50 रुपये झाली आहे. तर मुंबईत पूर्वी 1708 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता 1723 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये एका सिलेंडरची किंमत 1869.00 रुपयांवरून 1887 रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 1924.50 रुपयांवरून 1937 रुपयांपर्यंत वाढली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
घरगुती सिलेंडरचे दर ‘जैसे थे’
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 902 रुपये, मुंबईत 902.50 रुपये, कोलकात्यात 929 रुपये तर चेन्नईत 918 रुपये आहे. या दरांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. जानेवारीतही 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता.
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत जानेवारीत कपात
सरकारी तेल कंपन्यांनी मागील महिन्यात देखील 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत किरकोळ कपात केली होती. जानेवारी महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत केवळ दीड रुपयांनी कमी झाली होती. परंतु 1 फेब्रुवारी 2024 रोजी व्यावसायिक सिलेंडरचे दर तब्बल 14 रुपयांनी वाढवले आहेत.