नवी दिल्ली – डिसेंबर 2025 मधील घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक वाढून 0.83% इतका झाला आहे. या महिन्यात खाद्यांन्नाबरोबरच मनुफॅक्चरिंग क्षेत्रातील वस्तूच्या किमती वाढल्यामुळे ही महागाई वाढली असल्याचे सरकारने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. यामुळे आता घाऊक महागाई निर्देशांक आठ महिन्याच्या उच्चाकावर गेला आहे. मात्र डिसेंबर महिन्यात महागाई निर्देशांक वाढला असला तरी हा निर्देशांक अजूनही बराच कमी पातळीवर आहे. त्यामुळे याबाबत चिंतेचे कारण नाही असे विश्लेषकांनी नमूद केले. डिसेंबरअगोदर दोन महिने घाऊक महागाई निर्देशांक उणे पातळीवर होता. डिसेंबर महिन्यात हा जास्त भरला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये घाऊक महागाई निर्देशांक 2.57% इतका होता. म्हणजे वार्षिक पातळीवर या निर्देशांकात मोठी घट झाली असली तरी मासिक पातळीवर मात्र किंचित वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यपदार्थ बरोबरच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील वस्तू आणि खनिजे, कारखान्यासाठीची उपकरणे, कापड इत्यादीच्या दरात वाढ झाली आहे. याकडेवारी बद्दल बोलताना बार्कलेज इंडिया या कंपनीच्या मुख्य अर्थतज्ञ आस्था गिडवाणी यांनी सांगितले की, आता आगामी काळात घाऊक महागाईचा दर मंद गतीने वाढत जाण्याची शक्यता अधिक आहे. ईक्रा कंपनीचे वरिष्ठ अर्थतज्ञ राहुल अग्रवाल यांनी सांगितले की, रुपयाचे अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आयात महागात पडत आहे. त्याचा परिणाम आयात केलेल्या वस्तूच्या दरावर होत आहे. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यातही घाऊक किमतीवर आधारित महागाई वाढून 1.5% वर जाण्याची शक्यता जास्त आहे. रिझर्व बँक व्याजदर ठरविण्यासाठी घाऊक महागाईऐवजी किरकोळ महागाईच्या आकडेवारीचा विचार करते. डिसेंबर महिन्यातील किरकोळ महागाई वाढून 1.33% वर गेले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये या महागाईचा दर 0.71 टक्के इतका होता. मात्र रिझर्व बँकेने ठरविलेल्या 4% च्या उद्दिष्टापेक्षा किरकोळ किमतीवर आधारित महागाई कितीतरी कमी आहे. त्यामुळे या आघाडीवर चिंता करण्याची गरज नसल्याचे समजले जाते.