satara | वाईट प्रवृत्तीच्या घुसखोरीमुळे बदनामी वाढतेय: भास्करराव पेरे-पाटील

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – भारत देशात जवान व ग्रामीण भागातील महिला,मजूर हे दोनच घटक प्रामाणिकपने काम करत आहेत. अनेक क्षेत्रात चांगले काम करणारी माणस आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी वाईट प्रवृत्तीच्या लोकांची घुसखोरी वाढल्याने सार्वजनिक जीवनात बदनामी वाढत आहे, असे मत बीड जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच, समाज प्रबोधनकार भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.
गोरेगाव वांगी (ता. खटाव) येथे माऊली प्रतिष्ठानचे वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, औंधचे प. पू. श्यामपुरी महाराज, गटशिक्षण अधिकारी प्रतिभा भराडे, सोनाली विभूते, माजी जि.प.सदस्य जितेंद्रदादा पवार,
शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे, व्हा. चेअरमन शहाजी खाडे, ह. भ. प. सागर पवार, सह्याद्री साखर कारखाना संचालक संतोष घार्गे, हिमंतराव माने, प्रा. सदाशिव खाडे, माजी उपसभापती बबनराव कदम, अर्जूनशेठ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वेताळभक्त दादा महाराज पुजारी यांना गोरेगाव भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तर शहीद दत्तात्रय दळवी, शहीद कृष्णात कदम यांचे आई, वडील तसेच गावातील स्वातंत्र्यसैनिक शंकरराव माळी, दिवंगत स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ कदम, श्रीरंग कदम, रामचंद्र गुरव, महादेव चव्हाण यांचे वारसदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
पेरे-पाटील म्हणाले, गावच्या विकासासाठी सरपंच व इतर पदाधिकारी तसेच जनतेमध्ये सुसावांदाची गरज आहे . प्रगतीसाठी हेवेदावे कमी करा. दिवसेंदिवस लोकांचे आयुष्मान कमी होत चालले. सर्वसामान्य समाज चांगला आहे पण जबाबदार माणस भ्रष्ट झाली आहेत.
देशात, राज्यात स्वच्छता करणे अवघड काम.पण संत वचनाप्रमाणे प्रत्येकाने आपण, घर व गावा पासून चांगली सुरुवात करावी. स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, मुलांना चांगले शिक्षण द्या. स्वच्छता, वडीलधाऱ्या लोकांना जीव लावा. बाहेरचे न खाता घरचे, गावातील खावे. दुसऱ्यावर जळने सोडून द्या. हसून खेळून दोन दिवसाचे जीवन जगावे.
झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. हरिनाम सप्ताह करून पाऊस पडणार नाही. चारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावर शौचालयाचा वापर होत होता. काळाची गरज म्हणून आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. मराठा, ओबीसी व इतर जाती जमाती वाद राजकीय स्वार्थासाठी वाढवले जातात. वारकरी संप्रदायात जातीभेदाला शून्य किमंत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय सर्वोच्च आहे.लोकांनी अन्नदान, मतदान, गोदान, कन्यादान या चार गोष्टीला महत्व द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
धैर्यशील कदम यांनी भाषणात माऊली प्रतिष्ठानच्या कामामुळे गोरेगावचा नावलौकिक जिल्हाभर वाढत आहे. ही बाब एक गावकरी म्हणून अभिमानास्पद आहे. प्रतिष्ठानचे चांगल्या कामाला भाजपाच्या माध्यमातून सहकार्य केले जाई . संस्थापक सुनील सावंत यांनी स्वागत केले. अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर अरविंद मगर यांनी आभार मानले.





