पिंपरी (प्रतिनिधी): प्रतिबंधित क्षेत्रात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील मद्यप्रेमींनी अन्य भागात खरेदीसाठी घुसखोरी केली आहे. यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही दारूची दुकाने बंद करावीत, अशी मागणी नगरसेवक समीर मासुळकर यांनी केली आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील बहुतांश दुकाने सुरू झाली आहे. दीड महिन्यांपासून दारूची दुकाने बंद असल्याने मद्यप्रेमीचा हिरमोड झाला होता. पुन्हा करोना बाधितांची संख्या वाढल्यास सरकार ही दुकाने बंद करेल, या भितीपोटी अनेकजण जादा दारूची खरेदी करताना दिसत आहेत. एकीकडे दारूची जोरदार खेरदी सुरू असताना प्रतिबंधित क्षेत्रातील मद्यप्रेमी गप्प कसे बसतील? प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी दहा ते बारा वाजताच्या दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक खेरदीसाठी वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत मद्यप्रेमी दारू खरेदी करण्यासाठी प्रतिबंधित नसलेल्या परिसरात सर्रास जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता नगरसेवक समीर मासुळकर यांनी व्यक्त केली आहे. यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत दारूची दुकाने बंद करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.