श्रीनगरमधील घुसखोरीचा प्रयत्न संरक्षण दलाने हाणून पाडला ! कुपवाडा येथील चकमकीत एक घुसखोर ठार

श्रीनगर – उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न संरक्षण दलाने हाणून पाडला आहे. जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमधील कर्नाह येथे सुरक्षा दलांनी एका अज्ञात घुसखोराला ठार मारण्यात यश आले आहे. तसेच सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात 24 मार्च रोजी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न करताना सुरक्षा दलांनी एका अज्ञात घुसखोराला ठार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळच्या सुमारास कर्नाह भागातील जब्दी येथे नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांना संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने त्यादिशेने शोधमोहिम राबवली. त्यानंतर झालेल्या चकमकीत एक घुसखोर मारला गेला. अधिका-यांनी सांगितल्याप्रमाणे, घटनास्थळावरून एक एके-47 रायफल आणि काही दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
याआधी गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका सहाय्यकाला अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. उमर बशीर भट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो सोपोर येथील मांज सीरचा रहिवासी आहे.





