लक्षवेधी : श्रीमंतांमधील विषमता!
भारतातील श्रीमंताच्या यादीतील टॉप 108 श्रीमंतांकडे (Rich Person) एकूण संपत्तीपैकी 46 टक्के हिस्सा आहे. तर यादीतील तळाच्या 1520 श्रीमंतांकडे फक्त 9 टक्के संपत्ती आहे.

– हेमंत देसाई
Rich Person : भारतातील श्रीमंताच्या यादीतील टॉप 108 श्रीमंतांकडे (Rich Person) एकूण संपत्तीपैकी 46 टक्के हिस्सा आहे. तर यादीतील तळाच्या 1520 श्रीमंतांकडे फक्त 9 टक्के संपत्ती आहे. म्हणजे श्रीमंतांमध्ये देखील आज प्रचंड विषमता आहे!
भारत हा तरुणांचा देश असून, शिक्षणातील समस्यांमुळे हा वर्ग सध्या अस्वस्थ आहे. मात्र भारतात ज्येष्ठ नागरिकांची (Rich Person) संख्या वेगाने वाढत आहे. 2050 पर्यंत देशातील प्रत्येक पाचपैकी एक नागरिक हा 60 वर्षांवरील असेल. म्हणजेच 34 कोटींपेक्षा अधिक लोक हे ज्येष्ठ असतील. त्यापैकी जवळपास 70 टक्के ज्येष्ठ नागरिक हे ग्रामीण भागात राहतील, अशी माहिती ‘ट्रान्स्फॉर्म रुरल इंडिया’ संस्थेच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे.
जगातील प्रगत देश आधी श्रीमंत झाले आणि नंतर त्यांच्या लोकसंख्येत वयस्कर लोकांचे प्रमाण वाढले. परंतु भारत हा अजूनही विकसनशील देश असून, गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांची संख्या मोठी आहे. आर्थिक प्रगतीच्या टप्प्यावर असताना भारतात मात्र ज्येष्ठ नागरिकांची संख्या जलद गतीने वाढत असून, हा चिंतेचा विषय आहे.
एका ज्येष्ठ नागरिकामागे काम करणार्या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. 2001 मध्ये हे प्रमाण 8 टक्के होते तर आता ते 5 टक्क्यांवर आले आहे. याचा अर्थ असा की, येत्या काळात कमी कमावत्या व्यक्तींवर अधिक ज्येष्ठांची जबाबदारी येणार आहे.
नोकरीधंद्यासाठी तरुणवर्ग गावातून शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे. शिवाय आता विभक्त कुटुंबांचे (Rich Person) प्रमाण वाढत चालले आहे. लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे घरातील वृद्धांची देखभाल करणारे हात कमी पडत आहेत. आज देशातील 94 टक्के वृद्धांचा सांभाळ घरातील सदस्यच करतात आणि त्यांचा खर्चही उचलतात.
शिवाय भारतातील 66% मृत्यू मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यासारख्या आजारांमुळे होत आहेत. दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लहान गावात नियमित सेवा मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता ग्रामपंचायत, आशा सेविका, अंगणवाडी व स्वयंसहाय्यता गट आणि आयुष्मान आरोग्य मंदिरे यांना एकत्र जोडून, गावपातळीवर सेवाव्यवस्था उभारण्याची रास्त शिफारस या संस्थेच्या अहवालात करण्यात आली आहे. मुळात भारतातील सार्वजनिक आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण हे प्रगत देशांच्या मानाने खूप कमी आहे.
सेवा अर्थव्यवस्थेत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 2 टक्के गुंतवणूक केल्यास, 1 कोटी 10 लाख लोकांना रोजगार मिळू शकेल. याचा सगळ्यात जास्त फायदा हा खेड्यापाड्यातील महिलांना होऊ शकेल. सध्या महिलांना कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेण्यासाठीच जास्त वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे त्यांना बाहेर नोकरी देखील करता येत नाही. परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक साखळी निर्माण केल्यास, त्यांच्यावर योग्य ते उपचार होतील आणि त्याचबरोबर घरातच वावरणार्या महिलांना रोजगार मिळू शकेल, हे खरेच आहे.
शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था कमजोर असतानाच, भारतात काही लोकांच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ होत आहे. भारतातील प्रमुख उद्योगपती आणि वेल्थ क्रिएटर्सच्या संपत्तीत अभूतपूर्व वाढ झाल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. वेल्थ क्रिएटर्स म्हणजे संपत्ती निर्माण करणारे. वेल्थ क्रिएटर्सची एकूण वैयक्तिक संपत्ती 104 लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून, ती भारताच्या एकूण नाममात्र ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या 30 टक्के इतकी आहे.
कृषी इंटेलिजन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक 3000 श्रीमंत व्यक्तींची एकत्रित वैयक्तिक संपत्ती 104 लाख कोटी रुपये आहे. भारतात प्रचंड संपत्ती निर्माण होत असली, तरी तिचा मोठा भाग अजूनही देशातील सर्वात श्रीमंत लोकांकडेच आहे. म्हणजे टॉप 10 श्रीमंतांकडे एकूण 19 लाख कोटी रुपये संपत्ती असून, ती यादीतील एकूण संपत्तीच्या 19 टक्के आहे.
तर टॉप 108 श्रीमंतांकडे एकूण संपत्तीपैकी 46 टक्के हिस्सा आहे. अहवालात जी यादी निवडण्यात आली आहे, त्या यादीतील तळाच्या 1520 व्यक्तींकडे फक्त 9 टक्के संपत्ती आहे. म्हणजे श्रीमंतांमध्ये देखील आज प्रचंड विषमता आहे!
खरे तर अधिकाधिक लोकांकडे संपत्तीचे वितरण होणे हे इष्ट असते. परंतु भारतात संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. 2026च्या यादीत अनंत अंबानी, ईशा अंबानी आणि आकाश अंबानी हे श्रीमंतांच्या यादीतील पहिल्या तीन स्थानांवर आहेत. या तिघांकडे प्रत्येकी पावणेतीन लाख कोटी रुपये संपत्ती आहे. भारतातील टॉप 100 कुटुंबांची एकत्रित संपत्ती 76 लाख कोटी रुपये असून, त्यात गौतम अदानी, मुकेश अंबानी आणि सुनील भारती मित्तल ही घराणी आघाडीवर आहेत.
भारत स्वतंत्र होऊन 80 वर्षे लोटली, परंतु आर्थिक विषमता वाढतच गेली, हे लक्षात घेतले पाहिजे. सुदैवाने संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत दोन गोष्टी स्वागतार्ह आहेत. एक म्हणजे, 2026च्या ताज्या अहवालात संपत्ती निर्माण करण्यातील महिलांची उपस्थिती बरीच वाढली आहे. गेल्यावर्षी ही संख्या 559 होती, तर यंदा 738 महिला वेल्थ क्रिएटर्स आहेत. त्यामध्ये रोशनी नाडर मल्होत्रा, रेखा झुनझुनवाला, किरण मजुमदार शॉ, सावित्री जिंदाल आणि मंजू गुप्ता यांचा समावेश आहे.
दुसरी बाब म्हणजे, पूर्वी एका पिढीला लागणारा व्यवसाय उभारण्याचा (Rich Person) कालावधी हा आता एका दशकापेक्षाही कमी झाला असून, नव्या स्टार्टअप संस्कृतीमुळे खूप कमी काळात प्रचंड संपत्ती निर्माण होत आहे. झेप्टोचे सहसंस्थापक कैवल्य व्होरा आणि आदीत पालिचा यासारखे 25 वर्षांखालील उद्योजक आता भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे.
देशात आर्थिक परिवर्तन होत असून, गरीब-श्रीमंतातील दरी वाढत असली, तरी शून्यातून विश्व साकारणार्या व्यक्तींच्या संख्येत भर पडत आहे, ही चांगली गोष्ट आहे.






