#INDvWI ODI Series | रोहितसमोर उभा राहणार सलामीवीरांचा प्रश्न

मुंबई – हिटमॅन रोहित शर्मा एकदिवसीय संघात दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतल्याचा आनंद संघ व्यवस्थापनाला होत आहे. मात्र, त्याचवेळी आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार हा मोठा प्रश्न नवनियुक्त कर्णधार रोहितसमोर निर्माण होणार आहे.
वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. या मालिकेच्या सुरुवातीला तीन एकदिवसीय सामने येथे होणार आहेत. तर, त्यानंतर कोलकातामध्ये टी-20 मालिकेचे तीनही सामने होणार आहेत. रोहित संघात परतल्यामुळे सलामीला कोण जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारताच्या संघात शिखर धवनची निवड झाली असून त्याने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सरस कामगिरी केली आहे. यापूर्वी रोहितने सातत्याने धवनसह डावाची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हेच दोघे सुरुवात करणार का, त्यात काही बदल होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापतीमुळे रोहित सहभागी झालेला नव्हता. तेव्हा बदली कर्णधार म्हणून लोकेश राहुलने धवनसह डावाची सुरुवात केली होती. मात्र, आता राहुल कोणत्या क्रमाकांवर खेळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात राहुल व धवन यांचे वय पाहता या दोघांत राहुलकडे भविष्य म्हणून पाहिले गेले तर त्यालाच रोहितसह सलामीला संधी मिळेल. इतकेच नव्हे तर, सलामीसाठी इशान किशनच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे खरा प्रश्न यातून रोहित व संघ व्यवस्थापन कोणता मार्ग काढणार याची उत्कंठा लागली आहे.





