#INDvWI 2nd Test 5th Day : पहिल्या सत्रात पावसाचाच खेळ

त्रिनादाद :- भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात संततधार पावसाने व्यत्यय आणला. सामन्याच्या सोमवारच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी पहिले सत्र पावसामुळे वाया गेले.
रविवारी भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 182 धावांवर घोषित करत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तोपर्यंत वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यावेळी तेगनरेन चंदरपॉल 24 तर जेरेमी ब्लॅकवूड 20 धावांवर खेळत होते. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी केली होती.
त्यापूर्वी त्यांचा कर्णधार व सलामीवीर क्रेग बर्थव्हाईटला 28 धावांवर तर, कीर्क मॅकेन्झीला खाते उघडण्यापूर्वीच रवीचंद्रन अश्विनने बाद केले होते व भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. त्यावेळी वेस्ट इंडिजला विजयासाठी 289 धावांची गरज होती. दुसरीकडे भारताला या कसोटीत विजयासाठी 8 गडी बाद करण्याची आवश्यकता होती.
सोमवारी सकाळपासूनच संततधार पावसाला प्रारंभ झाला व पहिले सत्र पूर्ण वाया गेले. पहिली कसोटी जिंकत भारताने दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
याच दोन संघातील एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेला येत्या गुरुवारपासून बार्बाडोसला होत असलेल्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर या दोन संघात पाच टी-20 सामन्यांची मालिकाही होणार आहे.





