#INDvSA 4th T20 : मालिकेत बरोबरीची भारताला संधी; आफ्रिकेविरुद्ध आज चौथा सामना

राजकोट – पहिले दोन सामने गमावल्यावर तिसरा सामना जिंकत आव्हान जीवंत टेवलेल्या भारतीय संघाला पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शुक्रवारी होत असलेला चौथा सामना जिंकत बरोबरी करण्यासाठी बारतीय संघ उत्सूक आहे, तर या सामन्यासह भारतात पहिल्यांदाच टी-20 मालिका जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सज्ज आहे.
आयपीएल स्पर्धेत टी-20 सामनंचा अनुभव घेतल्यानंतरही भारतीय संघातील नवोदितांना सरस कामगिरी करता आली नव्हती व त्यामुळेच पहिले दोन्ही सामने भारताने गमावले होते. विशाखापट्टणमला मंगळवारी झालेला तिसरा सामना जिंकत भारताने या मालिकेतील आपले आव्हान जीवंत ठेवले असले तरीही आजचा सामना जिंकत मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर दडपण राखावे लागेल.
तिसरा सामना सुरु झाला तेव्हा भारतीय संघ द्विशतकी धावसंख्या उभारेल असे विश्वास होता मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे भारतीय संघाला मोठे आव्हान टेवता आले नव्हते. मात्र, फलंदाजांनी अपूर्ण ठेवलेले काम गोलंदाजांनी पूर्ण केले. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दीशाहीन गोलंदाजी केली होती व त्याचा पुरेपुर लाभ घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी वादळी फलंदाजी करत सामने जिंकले होते. तिसऱ्या सामन्यात मात्र, वेगवान व फिरकी गोलंदाजांनी पाहुण्यांवर वर्चस्व राखले. आता हेच सातत्य या मालिकेतील उर्वरीत दोन सामन्यात राखले तर भारताला केवळ बरोबरीच नव्हे तर ही मालिकाही जिंकण्याची संधी आहे.
पंत जबाबदारी कधी घेणार
या मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. मात्र, त्याच्या बेफिकिर वृत्तीचा फटका त्याच्यासह संपूर्ण संघाला बसत आहे. अनावश्यक फटकेबाजी, मोठे फटके मारण्यासाठी चुकीच्या चेंडूंची निवड करत त्याने स्वतःहून आपली विकेट गेल्या तीन ते चार मोसमांपासून बहाल केल्याचेच दिसले आहे. या मालिकेतही तेच चित्र असून तो जबाबदारी कधी घेणार असा प्रश्न आता चाहतेच नव्हे तर खुद्द समालोचकही विचारत आहेत.
खेळपट्टी फिरकीला पोषक
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या या मैदानावर हा सामना होत आहे. या मैदानाचा इतिहास पाहता फिरकी गोलंदाज जास्त वर्चस्व राखतील असे सांगितले जात आहे. मात्र, नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करणेच हितकारक ठरेल. संध्याकाळच्या सत्रात मैदानातील दवामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रीप करणे कठीण जाणार असल्याने प्रत्येक संघ पहिल्यांदा फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.





