#INDvENG 4th T20 : अटीतटीच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 8 धावांनी विजय

अहमदाबाद – अखेरच्या षटकांपर्यंत गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 177 धावाच करता आल्या. सूर्यकुमार यादव सामन्याचा मानकरी ठरला. या विजयासह पाच टी-20 सामन्याच्या मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी साधली आहे.
इंग्लंडकडून फलंदाजीत बेन स्टोक्सने सर्वाधिक 46(23) आणि जेसन राॅयने 40(27) धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त इंग्लंडकडून जाॅनी बेअरस्टोने 25(19), डेव्हिड मलानने 14(17), जोस बटलरने 9(6) आणि कर्णधार इयान माॅर्गनने 4(6) धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चरने 8 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या.
भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 तर हार्दिक पंड्या आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शार्दुलने आपल्या 4 षटकांत 42 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राहुल चहरने 4 षटकांत 35 धावा देत तर हार्दिक पंड्याने 4 षटकांत 16 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 30धावा देत 1 विकेट घेतली. वाॅश्गिंटन सुंदरची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने 4 षटकांत 52 धावा दिल्या, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गन याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचरण केलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी आणि श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 185 धावा केल्या.
भारताकडून सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत 18 चेंडूत 37 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त भारताकडून रिषभ पंतने 30(23), लोकेश राहूलने 14(17), रोहित शर्माने 12(12) आणि हार्दिक पंड्याने 11(08) धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहली केवळ 1 धाव काढून बाद झाला.
इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 4 षटकांत 33 धावा देताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर आदिल राशिद, बेन स्टोक्स,मार्क वुड आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.





