#INDvENG 2nd T20 : विराट कोहलीवर क्रिकेटप्रेमींचा संताप

लंडन – दीपक हुडा भरात असूनही अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीला सातत्याने भारतीय संघात संधी का दिली जाते. कोहली मोठा खेळाडू आहे पण जर हुडा जास्त सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करत असेल तर त्यालाच जास्त संधी मिळाली पाहीजे, अशा शब्दात भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी आपली मते मांडली आहेत.
कोहलीचे अपयश संपत नसून टी-20 सामन्यांत जर हुडा आपली गुणवत्ता सिद्ध करत असेल तर मग कोहलीलाच वारंवार संधी का दिली जाते. संघहित महत्वाचे ठरले पाहीजे खेळाडूची गत काळातील कामगिरी नव्हे, असेही चाहत्यांनी म्हटले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या येथे सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कोहली आपला प्रभाव दाखवू शकला नाही. कोहलीने 3 चेडूंत केवळ 1 धाव केली होती. तर पहिल्या सामन्यात दीपक हुडाने 17 चेडूंत 33 धावा केल्या होत्या. चांगली कामगिरी करून देखील हुडाला दुसऱ्या सामन्यातून वगळून कोहलीला संधी देण्यात आली होती, त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी कोहलीवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या जवळपास तीन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झालेली नाही. 2019 साली बंगलादेशविरुद्धच्या कसोटीत त्याने शतकी खेळी केली होती, त्यानंतर आजवर त्याला शतकी खेळी करता आलेली नाही. तसेच गेल्या तिन वर्षांत झालेल्या कसोटी, एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याला सातत्याने अपयशाचाच सामना करावा लागत आहे. त्यामुळे भारताचा सर्वात प्रमुख फलंदाज व माजी कर्णधा विराट कोहली याला ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघात स्थान मिळेल का या चर्चांनी जोर धरला असला तरीही ती संधी धूसर होत चालली आहे.





