Raj Thackeray – राज्य सरकारने कायदा आणला आहे. तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात. शहरामध्ये राहणारे नक्षल… तुम्ही जर कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान-सन्मान राखूनच तुम्हाला आणावे लागतील. त्या शिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ठणकावले. तसेच तसेच लाल ध्वजाच्या व्यासपीठावर आज दोन भगवे ध्वज एकत्र आले असल्याचेही सांगितले. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) 78व्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे होते. यावेळी त्यांनी मराठी भाषा, उद्योग आणि मराठी माणसाची जमीन यावर भाष्य केले. यावेळी महाविकास आघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते देखील मंचावर उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, आज रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी लागणारं मनुष्यबळ बाहेरच्या राज्यातून येत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार नाही, हे विदारक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एखाद्या प्रदेशात रस्ते आल्यानंतर तेथील राज्यकर्त्यांनी नीट लक्ष दिलं नाही तर तो प्रदेश बरबाद होतो. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांसाठी हिंदी भाषा कशी आणता येईल? आणि ती भाषा कशी शिकवता येईल? याचा विचार करत आहेत. पण महाराष्ट्रात जे काम धंद्यासाठी येत आहेत, त्यांना मराठी कशी येईल? याचा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात नाही. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील भूमिपूत्रांचा विचारच त्यांच्या मनात नाही. याचे सर्वात मोठं विदारक स्वरूप कुठे असेल तर ते रायगड जिल्ह्यात आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. अर्बन नक्षलसारखे वागाल्यास अटक – फडणवीस जनसुरक्षा कायद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांच्याकरिता (राज ठाकरे) हा कायदा बनलाच नाही. परंतु तुम्ही जर अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. पण तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागलात नाही तर तुमची अटक करण्याचे कारण नाही. परंतु जे लोक कायद्याच्या विरोधात आहेत, त्यांच्याकरिता तो कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे, त्यामुळे मला असं वाटतं जी विधान केली जात आहेत, ती कायदा न वाचता होत आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी राज ठाकरेंना लगावला.