प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 24 -औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकत्रित विचाराने विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रमांचे नियोजन करणे करता यावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे “इंडस्ट्री ऍकॅडेमिया फोरमची’ स्थापना करण्यात आली. आगामी काळात विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता व कार्यकुशलता वृद्धिंगत करण्यासाठी व त्यांच्यामध्ये अद्ययावत ज्ञान व कौशल्ये विकसित करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पाची सुरुवात म्हणून कौशल्य विकास केंद्रामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनावणे, आंतरशाखीय अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, कौशल्य विकास विभागाचे संचालक व वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विधी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती भाकरे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रत्यक्ष उद्योगांमध्ये प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी सहभागी अधिकाऱ्यांनी दिले. उद्योग क्षेत्रातील उपलब्ध संधी आणि त्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमांची गरज आहे, या विषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. संजीव सोनावणे यांनी यावेळी कौशल्य विकासाची सद्यस्थितीत गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
आंतरशाखीय अभ्यासमंडळाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने यांनी चर्चेत सहभाग घेऊन टेक्निकल रायटिंग कोर्समधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली.