एमआयडीसीतील वाढत्या गुंडगिरीमुळे उद्योजक त्रस्त

पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार ः भाजप नगरसेवकाने केली कारवाईची मागणी

चिखली – पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देणे असा त्रास काही गुंडांकडून होत आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक केशव घोळवे यांनी केली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना नगरसेवक घोळवे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, तळवडे, चिखली, कुदळवाडी, आदी औद्योगिक परिसरासह लगतच्या चाकण परिसरातील लघु उद्योजकांना कारखान्यामध्ये येवून काही गुंड स्क्रॅप, माथाडी तसेच लेबर सप्लायच्या नावाखाली राजरोसपणे जीवे मारण्याच्या धमक्‍या देत आहेत. उद्योजकांना कारखाना चालविण्यास मज्जाव केला जात आहे. सर्रास हप्त्याची मागणी केली जात असून त्यासाठी छोट्या कारखानदारांना नाहक वेठीस धरले जात आहे.

गुंडांच्या गैरवर्तवणुकीमुळे औद्योगिक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उद्योजकांबरोबरच संबंधित कारखान्यात काम करणारे कामगार देखील दहशतीच्या वातावरणात आहेत. औद्योगिक क्षेत्रात महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत गुंडांचा वाढता वावर धोकादायक होत चालला आहे. उद्योजकांनी बॅंकांमधून कर्ज काढून उद्योगधंदे सुरू केले आहेत. कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. परिश्रमातून ते दिवस कंठत असताना पैसे उकळण्यासाठी गुंडांचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. दिवसा-ढवळ्या अलिशान वाहनांमधून आठ ते दहा गुंड एकावेळी येतात. थेट कंपनीत शिरुन उद्योजकांना जीवे मारण्याची धमकी देत पैसे लुबाडतात. जे उद्योजक पैसे देत नाहीत अशा उद्योजकांचा जीव धोक्‍यात आहे. त्यामुळे अशा गुंडांवर कारवाई करुन कामगारांसह लघुउद्योजकांना सुरक्षिततेचे व भयमुक्‍त वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे नगरसेवक केशव घोळवे यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.