नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यातील पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली होती. मात्र या महिन्यातील औद्योगिक उत्पादन 6.7 टक्क्यांनी वाढले असल्याची आशादायक आकडेवारी सरकारने सोमवारी जाहीर केली. हा दोन वर्षातील औद्योगिक उत्पादनाचा उच्चांक आहे. मात्र आगामी काळात औद्योगिक उत्पादन याच गतीने वाढण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन पाच टक्क्यांनी वाढले होते. तर दोन वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2023 मध्ये औद्योगिक उत्पादन 11.9 टक्क्यांनी वाढले होते. ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 0.5 टक्क्यांनी वाढले असताना एकाच महिन्यामध्ये या उत्पादनात मोठी वाढ झाल्याबद्दल उद्योग वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता गेल्या वर्षाच्या 5.5% च्या तुलनेत यावर्षी आठ टक्क्यांनी वाढली आहे. खाण क्षेत्राने औद्योगिक उत्पादनाला चांगला आधार दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात या क्षेत्राचे उत्पादन 5.4 टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी या महिन्यात हे क्षेत्र केवळ 0.9 टक्क्यांनी विस्तारले होते. वाढलेली थंडी आणि इतर कारणामुळे नोव्हेंबर महिन्यातील वीज उत्पादन केवळ 1.5 टक्क्यांनी वाढले आहे. जेकी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 4.4% वाढले होते. मात्र एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीसाठीचे औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी कमालीची निराशाजनक आहे. या कालावधीत औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी 3.3% कमी झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत औद्योगिक उत्पादन 4.4 टक्क्यांनी वाढले होते. अशा परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात वाढलेले औद्योगीक उत्पादन आगमी काळात याच वेगाने वाढावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. 22 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेने 375 वस्तूंवरील जीएसटीत कपात केल्यामुळे मागणी वाढल्याने औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत झाली असल्याचे दिसून येते. मात्र अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर आगामी काळात काही प्रमाणात परिणाम दिसून येईल असे ईक्रा या संस्थेच्या मुख्य अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले.