Maval News: मावळातील ३६६ हेक्टर जागेत औद्योगिक वसाहत
Maval News: बऊर, करंज, ब्राह्मणवाडी परिसरात एमआयडीसीचा विस्तार

मावळ – मावळ तालुक्यात ३६६ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.
आता संबंधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या भूसंपादन मोबदल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
तालुक्यातील बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून हे औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार आहे. त्यासाठी बऊर आणि करंज येथील १८३ हेक्टर, तर ब्राह्मणवाडी येथील १८३ हेक्टर अशा एकूण ३६६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन प्रस्तावित आहे.
या जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. मोबदल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याने भूसंपादन प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे.
या औद्योगिक वसाहतीमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संरक्षण साहित्य आणि संबंधित उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना मावळात विस्ताराची संधी मिळणार आहे.
जागतिक क्षमता केंद्रे अर्थात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) उभारणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठीही या औद्योगिक क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांना मावळात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या औद्योगिक वसाहतीमुळे मावळ परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर उद्योग, व्यवसाय आणि पूरक रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मावळातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




