मुंबई – रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात उद्योगासाठी बँकांनी दिलेल्या कर्ज पुरवठ्यात वाढ होऊन हा कर्ज पुरवठा 9.6% इतका झाला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या कर्ज पुरवठ्यात 8.3 टक्क्यांनी वाढ झाली होती. ही आकडेवारी जाहीर करताना रिझर्व बँकेने सांगितले की, लघुउद्योगांना बँकांकडून झालेला कर्ज पुरवठा नोव्हेंबर महिन्यात दहा टक्क्यापेक्षा जास्त दराने वाढला आहे. उद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधा, इंजीनियरिंग, कापड, पेट्रोलियम आणि कोळशा संदर्भातील उद्योगांना जास्त प्रमाणात कर्ज पुरवठा झाला आहे. कृषी क्षेत्राला या महिन्यात झालेला कर्जपुरवठा 8.7% इतका झाला आहे. हा कर्ज पुरवठा गेल्या वर्षाच्या या महिन्यातील 15.3 टक्के या कर्ज पुरवठ्यापेक्षा कितीतरी कमी झाला आहे. म्हणजे उद्योगासाठीचा कर्ज पुरवठा वाढला असताना शेतीसाठीचा कर्ज पुरवठा कमी झाला आहे. सेवा क्षेत्रासाठी नोव्हेंबर महिन्यात झालेला कर्जपुरवठा काही प्रमाणात कमी होऊन 11.7% इतका झाला आहे. जोकी गेल्या वर्षी या महिन्यात 12.8% नी वाढला होता. ज्या क्षेत्रांना जास्त कर्ज पुरवठा झाला आहे त्यामध्ये एनबीएफसी आणि सॉफ्टवेअर उद्योगाला झालेल्या कर्ज पुरवठ्याचा समावेश आहे. व्यवसायिक बांधकाम आणि व्यापार क्षेत्राला झालेल्या कर्ज पुरवठ्यात वाढ झाली असली तरी ती कमी पातळीवर आहे. वैयक्तिक कर्ज पुरवठ्यात घट होऊन नोव्हेंबर महिन्यामध्ये या क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 12.8 टक्क्यांनी वाढला आहे. जोकी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 13.4 टक्क्यांनी वाढला होता. वाहनासाठीचा कर्जपुरवठा आणि सोन्याच्या तारणावर दिलेला कर्जपुरवठा बर्यापैकी वाढला आहे. तर घरासाठी करण्यात आलेला कर्ज पुरवठा आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून झालेला कर्ज पुरवठा मध्यम स्वरूपात वाढला असल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे.