Pimpri: गौराईच्याही स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज; माहेरवाशिणीच्या शृंगारासाठी महिलांची लगबग
Pimpri: नक्षीकाम केलेल्या रेडीमेड मुखवट्यांसह दागिने, गजरे आणि आरास साहित्याला मागणी

पिंपरी – गणरायाच्या आगमनानंतर आता घराघरांत गौराईच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. माहेरवाशिण म्हणून येणाऱ्या गौराईच्या आगमनाची महिलांना आतुरता लागली आहे. गौराईच्या आगमनासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये महिलांची गर्दी वाढू लागली आहे. आकर्षक नक्षीकाम केलेले रेडीमेड मुखवटे यंदाच्या खरेदीचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.
पिंपरी कॅम्प, भोसरी, चिंचवडगाव, थेरगाव, निगडी, भोसरी आणि सांगवी परिसरातील बाजारपेठांमध्ये गौरीच्या साहित्याने दुकाने सजली आहेत. गौराईच्या आरासासाठी लागणारे कापड, साड्या, दागिने, हार, गजरे, वेण्या, मुकुट आणि पूजेचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. विविध प्रकार आणि किमतींचे पर्याय असल्याने ग्राहकांना पसंतीनुसार खरेदी करता येत आहे.
गौराईच्या मुखवट्यांना यंदा विशेष मागणी आहे. नक्षीकाम, आकर्षक डोळे आणि विविध रंगसंगती असलेले मुखवटे बाजारात दाखल झाले आहेत. पितळी, फायबर आणि मातीचे मुखवटे उपलब्ध आहेत. साध्या मुखवट्यांची सुरुवात सुमारे ५०० रुपयांपासून होते. त्यांची किंमत अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. अधिक कलाकुसर आणि सजावट असलेल्या मोठ्या मुखवट्यांसाठी तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे.
दागिन्यांचे संच
गौराईच्या शृंगारासाठी कृत्रिम दागिन्यांचे विविध संचही बाजारात उपलब्ध आहेत. ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, मंगळसूत्र, नथ, कुड्या, बांगड्या, बाजूबंद आणि कंबरपट्टा यांचा त्यात समावेश आहे. काही संचांमध्ये मुकुटाचाही समावेश आहे. हलके आणि आकर्षक दागिन्यांचे संच १५० ते ८०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. मोठे आणि अधिक आकर्षक संच एक हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
वेण्या, गजरे आणि फुलांचे हार
गौराईच्या केशरचनेसाठीही विविध पर्याय बाजारात आले आहेत. कृत्रिम वेण्या, रंगीबेरंगी गजरे आणि फुलांचे हार महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. या साहित्याची सुरुवात ५० रुपयांपासून होते. काही आकर्षक फुलांच्या सजावटींसाठी ३०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.
रेडीमेड साहित्याला पसंती
गौराईच्या मस्तकासाठी विविध प्रकारचे मुकुट उपलब्ध आहेत. त्यावर मोती, खडे आणि नक्षीकाम करण्यात आले आहे. लहान सजावटीच्या वस्तू १०० रुपयांपासून मिळत आहेत. मोठ्या आणि अधिक सजावटीच्या वस्तूंसाठी ५०० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. यंदा रेडीमेड साहित्याला महिलांची पसंती मिळत आहे. तयार मुखवटा आणि शृंगार संचामुळे वेळ वाचत आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांसाठीही ही खरेदी सोयीची ठरत आहे. पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक सजावटीची सांगड घालण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
विशेष सजावट
गौराईच्या आगमनापूर्वी घराची स्वच्छता आणि आरास करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. घरातील महिला विविध सजावटीच्या वस्तूंची जमवाजमव करीत आहेत. काही ठिकाणी गौराईच्या स्वागतासाठी विशेष सजावट केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील खरेदीला पुढील काही दिवसांत आणखी वेग येण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाबरोबरच गौराईच्या आगमनाचा उत्साहही शहरात वाढताना दिसत आहे. बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. गौराईच्या स्वागतासाठी घराघरांत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.




