सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र विकसित करणार

अजित पवार; बंगळुरु- मुंबई इकॉनॉमिक कॉरिडोरअंतर्गत होणार औद्योगिक विकास
मुंबई – दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या धर्तीवर बंगळुरु- मुंबई इकॉनॉमिक कॉरिडोर विकसित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यात विशेष नोड म्हणून विकास करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यासंदर्भातील तांत्रिक आणि व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. या कॉरिडोरमधून महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय मंगळवारी तत्वत: घेण्यात आला.
ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आयोजित बैठकीत बंगळुरू- मुंबई इकॉनॉमिक कॉरिडोरअंतर्गत विशेष औद्योगिक नोड विकसित करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री अदिती तटकरे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
साधारणपणे दीड हजार हेक्टर जागा या क्षेत्रासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. मराठवाड्यापासून जवळ तसेच सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील सातारा जिल्ह्यातील ही जागा औद्योगिक विकासासाठी निवडण्यात आली आहे. व्यवहार्यता अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनआयसीडीसी) अंतर्गत बंगळुरु- मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित करण्यात येत आहे.
एमआयडीसी व एनआयसीडीसी यांच्या अनुक्रमे 51 टक्के आणि 49 टक्के भागीदारीतून कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. एमआयडीसी 51 टक्के गुंतवणूक जमिनीच्या स्वरुपात करणार आहे. केंद्र सरकार प्रत्येक नोडसाठी कमाल तीन हजार कोटी रुपये निधी देणार आहे. मुंबई- बंगळुरु महामार्गाच्या बाजूला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात दोन नोड विकसित करण्यात येणार आहेत. कर्नाटक सरकारने धारवाड येथे औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय मंगळवारी तत्वत: घेण्यात आला.





