Healthy Sweets: गोड खा, पण हेल्दी पद्धतीने! रक्षाबंधनासाठी बनवा ‘४’ खास मिठाई
Healthy Sweets खजूर, मखाना, नारळ, बेसन आणि ड्रायफ्रूट्स यांसारख्या पदार्थांचा वापर करून रक्षाबंधनासाठी चविष्ट गोड पदार्थ तयार करता येतात. मात्र, हेल्दी पर्याय असला तरी कोणतीही मिठाई मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

Healthy Sweets: रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आनंदाचा सण. राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई भरवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. त्यामुळे या दिवशी घरात विविध प्रकारच्या मिठाई आणि गोड पदार्थांची रेलचेल असते. मात्र, सध्या अनेक जण आपल्या आहाराबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे जास्त साखर, कॅलरी किंवा तुपाचा वापर असलेल्या मिठाईऐवजी काही घरगुती आणि तुलनेने संतुलित पर्याय निवडता येतात.
खजूर, मखाना, नारळ, बेसन आणि ड्रायफ्रूट्स यांसारख्या पदार्थांचा वापर करून रक्षाबंधनासाठी चविष्ट गोड पदार्थ तयार करता येतात. मात्र, हेल्दी पर्याय असला तरी कोणतीही मिठाई मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.
१. खजूराची मिठाई
खजूराचा वापर करून सोपी आणि स्वादिष्ट मिठाई तयार करता येते. यासाठी आधी खजुराच्या बिया काढून ते थोडे गरम करून मऊ करून घ्या. त्यानंतर खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका पॅनमध्ये बदाम, काजू आणि अक्रोड हलके भाजून घ्या. त्यात खजुराची पेस्ट घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण पॅनला चिकटणे कमी झाले की गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे छोटे लाडू किंवा बर्फीसारखे तुकडे तयार करता येतील. वरून बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून सजवा.
२. नारळाचे लाडू
नारळाचे लाडू हा आणखी एक सोपा पर्याय आहे. यासाठी किसलेला नारळ मंद आचेवर हलका भाजून घ्या. त्यात चवीनुसार थोडी साखर किंवा गूळ आणि दूध घाला. मिश्रण सतत ढवळत राहा, जेणेकरून नारळ व्यवस्थित मऊ होईल. त्यात बदाम आणि काजूचे तुकडे घाला. काही मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर छोटे लाडू वळा. लाडूंवर नारळाचा किस लावल्यास ते अधिक आकर्षक दिसतील.

खजूराची मिठाई
३. मखान्याचे लाडू
मखाना हा अनेक घरांमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. मखान्याचे लाडू बनवण्यासाठी मखाने मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये दरदरे वाटा. एका पॅनमध्ये थोडे तूप घेऊन बदाम, काजू आणि अक्रोड भाजून घ्या. त्यात मखान्याची पावडर घालून मिश्रण एकत्र करा. गोडीसाठी थोड्या प्रमाणात गूळ पावडर घाला. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे लाडू तयार करा.
४. बेसनाचे लाडू
बेसनाचे लाडू हा पारंपरिक आणि अनेकांचा आवडता गोड पदार्थ आहे. कढईत थोडे तूप गरम करून त्यात बेसन घाला. मंद आचेवर बेसन सतत ढवळत भाजा. बेसनाला हलका सोनेरी रंग आणि सुगंध आला की गॅस बंद करा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर किंवा बुरा आणि वेलची पावडर घाला. आवडीनुसार बदाम आणि काजूही घालू शकता. मिश्रण कोमट झाल्यावर त्याचे छोटे लाडू तयार करा.
मिठाई खाताना प्रमाण महत्त्वाचे
घरच्या घरी तयार केलेली मिठाई असल्यामुळे त्यातील घटकांवर आपले नियंत्रण राहते. तरीही गोड पदार्थ आरोग्यदायी आहे म्हणून तो अमर्यादित प्रमाणात खाणे योग्य नाही. रक्षाबंधनाच्या आनंदात मिठाईचा आस्वाद घ्या, पण प्रमाणाची काळजी घ्या. अशा प्रकारे चव आणि आरोग्य यांचा समतोल साधत सणाचा आनंद घेता येईल.





