विशाखापट्टणम – भारताचे वाढते जहाजबांधणी सामर्थ्य आणि स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेने वाटचालीचा दाखला म्हणून आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या दोन बहु-उद्देशी युद्धनौकांचा सोमवारी विशाखापट्टणम येथील नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने आयएनएस उदयगिरी आणि कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडने आयएनएस हिमगिरी या दोन वेगवेगळ्या शिपयार्ड्सनी स्वदेशी पद्धतीने बांधलेल्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रथमच एकाच वेळी नौदलात दाखल करण्यात आल्या आहेत. आपल्या भाषणात, संरक्षणमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, या युद्धनौका सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच सागरी हितांचे देखील रक्षण करतील तसेच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये देखील मदत करतील. त्यांच्या समावेशामुळे भारताच्या शेजारी प्रथम आणि महासागर या धोरणाला चालना मिळेल. भारतीय नौदलाची क्षमता वाढवणाऱ्या या युद्धनौकांनी भारत आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे आणि कोणत्याही परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यास सज्ज आहे, असा संदेश दिला असल्याचे असे ते म्हणाले. आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी ही सरकारच्या आत्मनिर्भरते प्रति दृढ संकल्पाचे झळाळते उदाहरण आहेत, परिवर्तनकारी चळवळीचे प्रतीक आहेत आणि सर्व संबंधितांच्या एकत्रित प्रयत्नांनी देश नवी उंची गाठेल आणि स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट साध्य करेल या दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत. समुद्री चाच्यांचा सामना करणे, तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध लढा देणे, सागरी दहशतवाद रोखणे अथवा नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत पुरवणे, या अत्यंत जटील आणि जोखमीच्या कार्यांमध्ये या युद्धनौका निर्णायक सिद्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अरबी समुद्रापासून मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकी किनारपट्टीपर्यंत सुरू असंख्य नौदल विषयक घडामोडी होत असतात, अशा परिस्थितीत, भारतीय नौदल देशाच्या हितांचे रक्षण करत आहे, आणि त्यामुळेच ते भारताच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहे, असेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले. आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या शिवालिक श्रेणी वर्गातील प्रमुख जहाज आयएनएस नीलगिरीच्या उत्तराधिकारी आहेत. यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, कमी रडार सिग्नेचर,टेहळणीसाठी प्रगत रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुपरसॉनिक पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्रे, पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आणि रॅपिड -फायर गन प्रणाली समाविष्ट आहेत. दोन्ही जहाजांमध्ये एकत्रित डिझेल किंवा गॅस प्रोपल्शन प्लांट आणि अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे, ज्यामुळे उच्च वेग आणि सुधारित इंधन कार्यक्षमता साधता येते. ब्लू वॉटर नेव्ही अर्थात सागरी नौदल मल्टी-मिशन फ्रिगेट्स अर्थात बहु-उद्देशीय युद्धनौका हे नौदलाच्या कार्यान्वयातील महत्त्वपूर्ण सहाय्यक घटक असणार आहेत. या युद्धनौकांमुळे नौदलाची सागरी मोहिमांमध्ये राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याची क्षमता वाढणार आहे. या युद्धनौका भावी पिढीतील शस्त्रे, सेन्सर्स आणि एकात्मिक व्यासपीठ व्यवस्थापन यंत्रणेने सुसज्ज आहेत. यासोबतच युद्धपरिस्थितीत हवाई हल्ले प्रतिबंधक, जमिनीवरून होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंधक आणि पाणबुडी हल्ला प्रतिबंध , सागरी नियंत्रण आणि मानवतावादी कार्ये करण्याच्या सुविधांनी सज्ज आहेत.