“जे अहंकारी होते, त्यांना प्रभू रामाने २४० वर अडवलं” ; संघाकडून भाजपावर खोचक टीका

Indresh kumar। लोकसभा निवडणुकीआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भाष्य केले होते. ज्यावर त्यावेळी उलटसुलट चर्चाही झाली. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. इंद्रेश कुमार यांनी थेट भाजपवर टीका केली आहे. “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने २४० च्या संख्येवर मर्यादित ठेवले”, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले.
त्यांना प्रभू रामाने २४० जागांवर अडवले Indresh kumar।
राजस्थानमधील जयपूरजवळच्या कनोटा येथे एका कार्यक्रमात बोलत असताना इंद्रेश कुमार यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा भाजप नेत्यांनी दिला होता. त्यावरून आता इंद्रेश कुमार यांनी, “ज्यांनी आजवर प्रभू रामाची भक्ती केली, ते अहंकारी बनत गेले. ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे जाहीर केले, त्यांना प्रभू रामाने २४० जागांवर अडवले. त्यांचा अहंकार यासाठी कारणीभूत ठरला.” लोकसभेच्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारे भाष्य केले होते. त्यानंतर आता इंद्रेश कुमार यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लोकसभेच्या निकालानंतर भाष्य करताना भाजपाला अप्रत्यक्ष खडे बोल सुनावले होते. “लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी. मात्र, हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवे”, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती.
खरा सेवक अहंकारी नसतो Indresh kumar।
मोहन भागवत पुढे म्हणाले, “एक खरा सेवक काम करताना शिष्टाचार राखतो. शिष्टाचार राखताना तो अविचल राहतो. ‘मी हे केले, ते केले’ असा कोणताही श्रेयवाद करत नाही. सेवक कधीच अहंकार दाखवत नाही. तो नेहमी शिष्टाचार पाळतो. फक्त अशा व्यक्तीलाच सेवक म्हणण्याचा अधिकार आहे.”





