Indrayani River Pollution : ( रामकुमार अग्रवाल/ सुनील बटवाल ) – संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळ आळंदी या दोन्ही पवित्र तीर्थक्षेत्रांमधून वाहणारी इंद्रायणी नदी आज अक्षरशः प्रदूषणाच्या विळख्यात तडफडत आहे. वारकरी संप्रदायाच्या असंख्य भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेली ही जीवनदायिनी नदी सध्या गटारगंगेत रूपांतरित होत असल्याचे संतापजनक चित्र उघड झाले आहे. निर्माल्याचे ढिगारे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी, फुटलेल्या मैला वाहिन्या, जलपर्णीचा फैलाव आणि नदीपात्रातील बेकायदेशीर अतिक्रमणे, या साऱ्यांनी मिळून इंद्रायणीच्या अस्तित्वालाच आव्हान उभे केले आहे. लोणावळ्यात उगम पावणारी आणि देहू परिसराला सुमारे नऊ किलोमीटरचा वेढा घालणारी इंद्रायणी नदी धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आषाढी वारी, कार्तिकी वारी आणि विविध सोहळ्यांच्या काळात लाखो वारकरी येथे स्नान करून नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र ज्या पाण्याला तीर्थ म्हणून मान दिला जातो, त्याच पाण्यात आज सांडपाणी आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे दृश्य पाहून वारकरी आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. धार्मिक विधींनंतर नदीत टाकले जाणारे निर्माल्य मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात साचत आहे. फुले, माळा, प्लास्टिक पिशव्या आणि इतर पूजाविधीतील वस्तू नदीत टाकल्या जात असल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते. निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असतानाही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोई ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. निवेदन देताना सरपंच शिला रोकडे, उपसरपंच सोमनाथ गवारी, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, सारिका करपे, आरती फलके, पोलीस पाटील निखिल रोकडे आदी उपस्थित होते. तथापि, प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. नदीपीत्राला सांडपाण्याचा मारा देहू आणि आसपासच्या भागात झपाट्याने उभ्या राहत असलेल्या नव्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मैला शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) नसल्याने ओढे-नाल्यांमार्फत सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. काही ठिकाणी मैला वाहिन्या आणि चेंबर फुटल्यामुळे मैलमिश्रीत पाणी उघडपणे नदीपात्रात मिसळताना दिसते. स्थानिकांच्या मते, सुमारे ४० टक्के दूषित पाणी थेट नदीत जात आहे. हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे, तर पर्यावरणाशी केलेले गुन्हेगारी कृत्य असल्याचा आरोप होत आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काही महिन्यांपूर्वी नगरपंचायतीला १४ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र दंड आकारून प्रश्न सुटला काय? प्रत्यक्षात नदीतील प्रदूषणाची स्थिती जैसे थेच असल्याचे वास्तव आहे. नदी प्रदूषण दंडात्मक कारवाई ही केवळ कागदोपत्री कारवाई ठरत असून, अंमलबजावणीचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, मोशी या भागांतून मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेले सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचा गंभीर आरोप मोई (ता. खेड) ग्रामपंचायतीने केला आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या सांडपाण्यामुळे मोई-चिंबळी परिसरातील शेती धोक्यात आली आहे. विहिरी, कूपनलिका आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे स्त्रोत दूषित झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. दूषित पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटत असून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जलपर्णीचा विळखा आणि आरोग्याचा धोका सध्या नदीपात्रात जलपर्णी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दूषित पाण्यात जलपर्णी झपाट्याने वाढते आणि पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटवते. परिणामी मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढली आहे. जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे पर्यावरणतज्ञांच्या मत आहे. जलपर्णीच्या थरामुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि डासांची उत्पत्ती वाढते. मलेरिया, डेंग्यू आणि इतर साथीचे रोग फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिक्रमणामुळे नैसर्गिक पात्र अरुंद नदीपात्रालगत सुरू असलेली प्लॉटिंग, अनियंत्रित बांधकामे, घाटांचे काम, जलवाहिनी टाकण्याचे प्रकल्प आणि पुलांच्या बांधकामावेळी टाकलेला मुरूम, माती आणि राडारोडा यामुळे नदीचे नैसर्गिक पात्र अरुंद होत आहे. कंत्राटदारांच्या मनमानीमुळे आणि नियंत्रणाच्या अभावामुळे नदीचा श्वास गुदमरतो आहे. पावसाळ्यात सलग मुसळधार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीपात्रातील भराव आणि अतिक्रमणामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून भविष्यात मोठा अनर्थ ओढवू शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष की संगनमत? लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या इंद्रायणीच्या प्रदूषणाकडे शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना प्रबळ झाली आहे. दंडात्मक कारवाई करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे का, असा संशयही आता उपस्थित होत आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, विद्यमान एसटीपी कार्यक्षम करणे, फुटलेल्या वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करणे, निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणे, नदीपात्रातील अतिक्रमणे हटविणे आणि जलपर्णी निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविणे, या सर्व उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे.