आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील कोट्यवधी भाविकांची श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी वाढत्या जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा पांढर्या फेसाने फेसाळली असून, नदीचे विदारक स्वरूप पाहून भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून रसायनयुक्त व मैलामिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडा-रोडा व कचरा टाकला जात असून, पुलांच्या बांधकामातून पडलेला मलबा अद्याप न हटविल्याने नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. यासोबतच पूर नियंत्रण रेषेत सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांकडेही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व आळंदी नगरपरिषद फक्त नदीकाठ विकास प्रकल्पांवर भर देत असून, प्रत्यक्ष नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने नदी स्वच्छ न करता विकास कशासाठी? असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. जय गणेश मंदिर परिसर, स्मशानभूमी भाग तसेच विविध घाट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून तातडीने प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच श्री स्वामी महाराज घाटाजवळील पुलाखालील भुयारी मार्ग (सब-वे) अद्याप वापरासाठी खुला न झाल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागत असून, जलशुद्धीकरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. नदीवरील पाणी साठवण बंधार्यांची दुरवस्था व गळतीमुळेही पाणी साठवणीत अडथळे निर्माण होत आहेत. मुख्यमंत्र्यांना निवेदन दरम्यान, आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदने सादर करून इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, पुणे जिल्हा प्रशासन व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे.