वाघ्या कुत्रा नक्की आला कुठून? इंद्रजित सावंतांनी दिली महत्त्वाची माहिती

Indrajit Sawant On Waghya Dog Memorial | रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहित मागणी केली आहे. आता यासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी देखील याबाबत माहिती दिली. सावंत यांनी वाघ्या कुत्रा हे पात्र नेमकं आलं कुठून याची माहिती दिली.
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना इंद्रजित सावंत यांनी या मुद्यावर भाष्य केले. राम गणेश गडकरींच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी दिली. तसेच, इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याचा कोठेही उल्लेख नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
इंद्रजित सावंत म्हणाले की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे कपोकल्पित आहे, याची इतिहासात नोंद नाही. कुठेही नोंद नसताना या स्मारकाला संरक्षण दिले जात आहे. शिवरायांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली आहे. तसेच, संभाजीराजे छत्रपतींची मागणी योग्य असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजेंनी काय मागणी केली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 411 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.





