Gambling Raid : इंदोर जिल्ह्यात एका आयएएस अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत १८ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १३.६८ लाख रुपयांची रोकड, ३० मोबाईल फोन आणि पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर मुख्यालयापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील अवलिपुरा गावातील एका फार्महाऊसमध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री विशेष पथकाने अचानक छापा टाकला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा फार्महाऊसचा मुख्य दरवाजा बंद होता. मात्र, आतमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी दबक्या पावलांनी आत प्रवेश करत कारवाई केली. या कारवाईत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले, तर अंधाराचा फायदा घेत सहा जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांच्या तपासात जगदीश राठोड हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. फार्महाऊसचा केअरटेकर त्याला मदत करत असल्याची माहितीही पुढे आली असून छाप्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, पोलिसांच्या तपासात हे फार्महाऊस आयएएस अधिकारी वंदना वैद्य यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. त्या सध्या मध्य प्रदेशच्या फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणाबाबत त्यांची अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.