ट्रम्प यांच्या निर्णयाने ‘या’ देशाचा शेअर बाजार हादरला, घसरण एवढी की थांबवावे लागले ट्रेडिंग

Indonesian Share market | ब्लॅक मंडेनंतर आज (8 एप्रिल)आशियाई आणि भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र, दुसरीकडे इंडोनेशियाच्या शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी इंडोनेशियाच्या शेअर बाजारात तब्बल 9 टक्क्यांची मोठी पडझड झाली, ज्यामुळे इंडोनेशिया स्टॉक एक्सचेंजला तात्पुरते ट्रेडिंग थांबवावे लागले. जवळपास 30 मिनिटांसाठी शेअर बाजारातील व्यवहार थांबवावे लागले होते.
अचानक पडझडीचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या शुल्क धोरणांमुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि त्याचा आशियाई बाजारांवर पडणारा परिणाम इंडोनेशियामध्ये स्पष्टपणे दिसून आला. सुट्ट्यांनंतर बाजार पुन्हा सुरु होताच इंडोनेशियाचा मुख्य इंडेक्स (.JKSE) सुरुवातीच्या व्यवहारात 9.2 टक्क्यांनी घसरून जून 2021 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसाखेर प्रमुख इंडेक्स 7.9 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
रुपयाची (Indonesian Rupiah) ऐतिहासिक घसरण
फक्त शेअर बाजारच नाही, तर इंडोनेशियन रुपयाही 1.9 टक्क्यांनी घसरून प्रति डॉलर 18868 वर पोहोचला आहे. ही पातळी आशियाई आर्थिक संकटातील स्तरापेक्षाही खालची आहे. इंडोनेशियन रुपया आतापर्यंतच्या सर्वात कमकुवत स्थितीत आहे.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी वरिष्ठ आर्थिक अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक घेतली. अमेरिकेशी पुढील आठवड्यात होणाऱ्या व्यापार वाटाघाटींपूर्वी, अमेरिकन आयातीसाठी काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहे. हे धोरण संभाव्य 32% आयात शुल्क टाळण्यासाठी आखले आहे.
इंडोनेशिया स्टॉक एक्सचेंजने काही नियमावली लागू केली आहे. जर मुख्य इंडेक्समध्ये 8 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्यास ट्रेडिंग ३० मिनिटांसाठी थांबवले जाईल. 15 टक्क्यांची घसरण झाल्यास पुन्हा 30 मिनिटे व्यापार थांबवला जाईल. 20 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्यास त्या दिवशीचा संपूर्ण व्यवहार बंद केला जाईल.





