पालेमबांग (इंडोनेशिया) : इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर एक बस खोल दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात किमान 28 जण मृत्यूमुखी पडले. तर 13 जण जखमी झाले, असे पोलीस आणि बचाव पथकाने सांगितले.
ही बस शेजारच्या बेंगकुलु येथून प्रांतीय राजधानी पालेमबंगकडे निघाली होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला होता, असे काही प्रवाशांनी सांगितले. परंतु पोलिस अद्याप अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दक्षिण सुमात्रामधील पागारालम जिल्ह्यात हा अपघात घडला.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस 80 मीटर खोल दरीत कोसळली आणि वेगवान वाहणाऱ्या नदीत पडली. त्यामुळे काही प्रवासी नदीच्या प्रवाहात पडले. त्यापैकी एका मुलाला नदीच्या पात्रातून बाहेर काढले गेले.
काही प्रवासी नदीच्या पात्रातून वाहून गेले असावेत, असा अंदाज आहे. मृतदेह ओळख पटवण्यासाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत, असे बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.